राज्यात पावसाचा जोर ओसरणार

मुंबई : मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून राज्यातील अनेक भागात पाऊस ओसरला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात पावसाने झोडपून काढले. अनेक भागात पूरस्थितीही निर्माण झाली होती. मात्र, सोमवारपासून राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. पुणे, मुंबईसह ठाणे परिसरात चांगला पाऊस झाला आहे. त्याच वेळी पालघर, नंदुरबार, औरंगाबाद जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. पुण्यासह परिसरात मंगळवारी सकाळी पावसाच्या सरी कोसळल्या.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर कमी होताना दिसत आहे. मुंबई, ठाणे, औरंगाबादसह परिसरात पावसाने हजेरी लावली. तर सोमवारपासून औरंगाबादसह, जालना, परभणी, बीड या भागात पावसाचा जोर ओसरला आहे. सोमवारी संध्याकाळी पावसाच्या सरी कोसळल्या मात्र, त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याचे पाहायला मिळाले. गेल्या दोन दिवसांपासून सूर्यदर्शन झाले नव्हते. मात्र, मंगळवारी सकाळपासूनच सूर्यदर्शन झाले आहे. दरम्यान, मंगळवारी विदर्भातील सर्व जिल्हे तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला. तर पुणे आणि सोलापूरमध्येही यलो अलर्ट देण्यात आला.
जमिनीलगत उच्च दाब तयार झाला असून, त्यातून घड्याळ काट्याच्या दिशेने वाहणाऱ्या प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे नैऋत्य मोसमी पाऊस परतण्यासाठी अनुकूल स्थिती तयार झाली आहे. २१ सप्टेंबरपर्यंत कधीही या भागातून माॅन्सून परतण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे.
-माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ
दरम्यान, २१ सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर काही प्रमाणात कमी राहणार आहे. भारताच्या वायव्य भागात पश्चिम राजस्थानातील श्रीगंगानगर, बिकानेर, जोधपूर, जैसलमेर, बारमेर, झालोर यासह पंजाब, हरयाणा, दिल्ली, चंदीगड, सौराष्ट्रातील कच्छचे रण या भागात वातावरणात बदल झाला आहे.