जामिनावर सुटल्यानंतर कच्च्या कैद्यांच्या वकील; कायद्याच्या ‘भार’वाही सुधा…

मुंबई : खुर्चीच्या पाठीला अडकवलेला त्यांचा काळा कोट… त्यांच्या टेबलवरील कॉम्प्युटरमध्ये राज्यातील अनेक न्यायालयांच्या वेबसाईटच्या विंडोज… हाताशी असणारा हाताने लिहिलेल्या पत्रांचा गठ्ठा… हे चित्र आहे, भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी असणाऱ्या सुधा भारद्वाज यांच्या निवासाचे….
कारागृहात तीन वर्षे काढल्यानंतर सुधा भारद्वाज यांना जेव्हा जामीन मिळाला त्या वेळी त्यांनी विलासपूर येथून त्यांच्या मुलीकडून काळा कोट आणि वकिलीची सनद मागवून घेतली. मात्र, वकिली करणे तेवढे सोपे नव्हते. मुंबईत घर करणे हेही एखाद्यासाठी अशक्यप्राय, ऑफिससाठी जागेचा विचारच सोडून द्या. न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात वास्तव्याची अट जामीन देताना घालण्यात आली. त्यामुळे गेल्या १० महिन्यांत त्यांनी तीनदा घर बदलले. अखेरीस त्यांना एक बेडरूमची खोली अंधेरीत मिळाली. त्यानंतर सुधा यांनी पूर्णवेळ वकिली करण्याचा निर्णय घेतला. येरवडा आणि भायखळा जेलमध्ये त्यांची सहबंदिजनांमध्ये ‘अर्जीवाली दीदी’ अशी ओळख होतीच. त्या महिला कैदीच त्यांच्या पहिल्या अशील. कारागृहात त्यांनी कच्च्या कैद्यांसाठी असंख्य जामीन अर्ज लिहिले होते. त्यांना जामीन मिळाला. त्यांनी या कच्च्या कैद्यांना कायदेशीर मदतीसाठी त्यांनी आपला पत्ता मिळेल, याची व्यवस्था केली.
बहुतांश प्रकरणांत कच्च्या कैद्यांसाठी सरकारतर्फे वकील दिला जातो. त्यांनी जामिनासाठी अर्ज करणे आणि कायदेशीर सल्ला देणे अभिप्रेत असते. मात्र त्याची त्यांना फिकीर नसते. त्यामुळे हे कैदी अंधारातच राहतात. मी फक्त ही रिकामी जागा भरण्याचा प्रयत्न करत आहे. अर्थात त्यामुळेही खूप फरक पडेल, भारद्वाज आपली भूमिका मांडतांना सांगतात. आपल्याला पत्र पाठवणाऱ्या कच्च्या कैद्यांसंदर्भात न्यायालयीन आदेश शोधण्यात त्या दिवस घालवतात. त्याच्या प्रिंट काढून त्या स्वखर्चाने पाठवतात. त्यांचा मागील आणि भविष्यातील कागदपत्रांची त्यासाठी गरज असते. कच्चे कैदी आपले सहकारी आणि त्यांच्या वकिलांशी चर्चा करतात.