आधुनिक महाभारत

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील ध्वनिक्षेपकाचा मुद्दा हाती घेतला आणि संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले. वास्तविक, हा मुद्दा त्यांनी पहिल्यांदाच उचलला नाही. यावर पूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीदेखील इशारे दिले होते. यावेळचा वेगळा मुद्दा आहे तो म्हणजे ध्वनिक्षेपकाचा आवाज कमी झाला नाही, तर त्यासमोर भोंगे लावून हनुमान चालिसा पठण करण्याचा. खरेतर त्यावरून महाभारत पेटले आहे!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हनुमान चालिसा पठणावरून घेतलेली भूमिका फारच आक्रमक आणि सरकारच्या जिव्हारी लागलेली दिसते. आजपासूनच म्हणजे ईदनंतर मशिदींवर बेकायदा असलेले भोंगे मोठमोठ्याने वाजवले जाणार असतील, तर त्यासमोरच्या इमारतीवरून हनुमान चालिसाचे पठण केले जाईल, असा इशारा कम आदेश राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत दिला आहे. त्यांनी हाच आदेश यापूर्वी मुंबई आणि ठाण्यातील जाहीर सभांतून दिला होता आणि त्याचे पडसाद देशभर उमटले. ध्वनिक्षेपक लावण्यासंबंधी जे काही सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत, त्याचे ठाकरे सरकारने महाराष्ट्रात तंतोतंत पालन करावे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली आहे.
औरंगाबाद येथील राज ठाकरे यांची सभा सुरू असतानाच मशिदीवरून ध्वनिक्षेपकाची गर्जना ऐकू आली आणि त्याच ठिकाणी राज ठाकरे वैतागलेले दिसले. अतिशय तिखट आणि स्पष्ट शब्दांत त्यांनी पोलिस अधिकार्यांना, तसेच सरकारला याबाबत ठणकावले. रविवारी नाही पण सोमवारी त्याचे जोरदार पडसादही उमटले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच पोलिस अधिकार्यांच्या अनेक बैठका झाल्या. सर्वांनीच शांततेचे आवाहन केले आहे. वास्तविक, ध्वनिक्षेपकाबाबत राज ठाकरे यांनी मांडलेली भूमिका नवीन नाही. त्यांनी यापूर्वी ही भूमिका वेळोवेळी मांडली होती किंबहुना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही या मुद्द्यावर कडाडून टीका केली होती. ध्वनिक्षेपक काढले गेले नाहीत तर त्या मशिदीसमोर तेवढ्याच मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावून त्यावरून हनुमान चालिसाचे पठण करावे, हा राज ठाकरे यांचा आदेश पूर्वीच्या परिस्थितीपेक्षा वेगळा आहे आणि या मुद्द्यावरच तेढ निर्माण होण्याची शक्यता सर्वांना वाटत आहे. केवळ अल्पसंख्याकांच्या मतांचे लांगूलचालन करण्यासाठी मशिदींवर ध्वनिक्षेपक चालू राहणार असतील, तर मनसे त्याविरोधात हनुमान चालिसा घेऊन पठण करील हाच त्यांच्या इशार्यामागे हेतू आहे. नेहमीप्रमाणे राज यांच्या सभांना प्रचंड गर्दी होतीच. पण सर्व मराठी वृत्तवाहिन्यांनी त्याचे थेट प्रक्षेपण केल्याने त्यांच्या सभेला मोठी प्रसिद्धी मिळाली. राज त्यांना जे अपेक्षित होते तेच घडले. त्यांच्या इशार्यानंतर सरकारही गडबडले. राज हे हिंदुत्ववादी अजेंडा राबवू लागले आहेत, राज यांनी त्यांच्या पक्षाच्या झेंड्यातून हिरवा रंग काढून टाकला आहे, राज पुन्हा भाजपचा अजेंडा राबवू लागले आहेत, अशी टीका महाआघाडीने सुरू केली.
राज यांनी हनुमान चालिसाचे नाव घेतले, तेव्हाच खरे तर विरोधक हादरून गेले. हनुमान चालिसाच्या घोषणेने राज्यातील वातावरण एवढे तापेल, असे कुणाला वाटले नव्हते. चालिसासाठी कोणी प्रत्यक्ष रस्त्यावर येऊन आंदोलन केले नव्हते. पण राज ठाकरे यांच्या घोषणेनंतर आता ती वेळ आली आहे. कदाचित आज अक्षय तृतीयेच्या दिवशी हिंदुत्ववादी रस्त्यावर येऊन हनुमान चालिसा पठण करतील. काही ठिकाणी महाआरतीदेखील होणार आहे. त्यात स्वतः पुण्यामध्ये राज ठाकरे भाग घेतील, तर मुंबईत ती जबाबदारी आदित्य ठाकरे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या सर्व घडामोडी होत असताना राज ठाकरे यांनी पूर्वीच्या अनुभवातून किंवा राणा दाम्पत्याच्या कारवाईतून काही खास बोध घेतलेला दिसतो. आपल्यावर तसेच मनसैनिकांवर गुन्हे दाखल होणार, हे गृहीत धरूनच त्यांनी मनसेच्या दिमतीला तब्बल दोन हजार वकिलांची फौज तयार करून ठेवली आहे. यावरून स्पष्ट दिसते, की राज ठाकरे यांचा हा हनुमान चालिसाचा लढा पूर्ण विचार करूनच आहे. सरकारने योग्य पावले उचलली नाहीत तर अनेक ठिकाणी ताणतणाव किंवा संघर्ष अटळ आहे. दोन्ही बाजूंनीही योग्य विचार करून पुढील भूमिका घेतली जावी. सध्याच्या काळात तेच जरुरीचे आहे, हे नक्की!