ताज्या बातम्या

पीएमपी सेवा सुधारेल का ?

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर : नव्या अध्यक्षांपुढे आव्हाने

राष्ट्रसंचार न्यूज नेटवर्क
पुणे : सध्या पीएमपीचे प्रवासी बसची वाट पहात ताटकळत उभे आहेत, असे दृश्य बसथांब्यांवर सर्रास दिसते. पीएमपीचे नवे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडून बस प्रवाशांच्या अनेक अपेक्षा आहेत. पुणे महापालिकेत बकोरिया यांनी उत्तम कारभार करून शिस्तप्रिय, कल्पक अधिकारी अशी प्रतिमा निर्माण केली. सध्या प्रशासकीय राजवट चालू आहे, पण दोन चार महिन्यांत निवडणुका होतील आणि राजकीय हस्तक्षेप कारभारात वाढेल. तेव्हा बकोरिया यांना मदत पूर्ण करता येईल का ? असा पेच उभा राहील.

पीएमपी कारभारात कडक धोरण ठेवणाऱ्या तुकाराम मुंडे यांची राजकीय हस्तक्षेपातून बदली झाली होती. श्रीकर परदेशी यांनी व्यवस्थापकीय संचालक नात्याने पकड ठेवली होती. पण त्यांची बदली मुदतीपूर्वी पंतप्रधान कार्यालयात झाली. एक तर चांगले अधिकारी पीएमपी संस्थेला मिळत नाहीत आणि मिळाले तर टिकू दिले जात नाहीत. या चक्रातून पीएमपी बाहेर पडली तर सुधारणांना वाव राहील. बकोरिया यांना पूर्ण स्वातंत्र्य मिळावे आणि मुदत पूर्ण करता यावी, अशी अपेक्षा याकरिता आहे.

काही माजी नगरसेवकांनी आणि पुढाऱ्यांनी मतदार खूश करण्यासाठी आणि बिल्डर्सच्या जागांना भाव यावा याकरिता पीएमपी बससेवेचे मार्ग वाढविले. या पद्धतीने चालू राहिलेले तोट्यातील लांब पल्ल्याचे मार्ग बंद करण्याचे बकोरिया यांनी ठरविले आहे. तोटा कमी करून बसगाड्या गर्दीच्या मार्गावर वाढविण्याचा त्यांचा विचार आहे.

ज्या गावात एसटी जाते तिथे पीएमपी कशाला? असाही मुद्दा आहे. यातून दोन्ही वाहतूक संस्था अडचणीत आल्या आहेत. तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या चालू ठेवायच्या का? याचे धोरण बकोरिया यांनी निश्चित करायला हवे. बस मार्गांचे फेरनियोजन, प्रवासी संख्या वाढीसाठी सुलभ सेवा आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन योजना आखणे गरजेचे आहे. पीएमपीकडे सध्या १६०० गाड्यांचा ताफा आहे, तो २००० गाड्या करायला हवा आणि त्यातही जास्तीत जास्त गाड्या मार्गावर धावतील यासाठी आगारप्रमुखांना जबाबदार धरायला हवे. वेळप्रसंगी त्यांच्यावर कारवाईची पावले टाकायला हवीत. श्रीकर परदेशी यांनी हा प्रयोग केला होता. गर्दीच्या वेळी स्टार्टर्स मोक्याच्या ठिकाणी आणि मोक्याच्या वेळी जास्त संख्येने थांबायला हवे.

सध्याच्या राज्य सरकारने रिक्षा भाडेवाढीस मंजुरी दिली आहे. रिक्षाचे किमान भाडे २५ रुपये झाले आहे आणि पुढील टप्प्यात सुद्धा दरवाढ केली आहे. सामान्य नागरिकाला भाडे परवडत नाही, त्यांची पीएमपीने जाण्याची तयारी आहे. अशा संधीचा फायदा उठवून पीएमपी प्रशासनाने पासचे दर कमी करणे वा इतर सवलती देऊन प्रवासी संख्या वाढवायला हवी. नव्या अध्यक्षांनी या परिस्थितीचा विचार करायला हवा.

येत्या काही महिन्यांत मेट्रो रेल्वे सेवेचा मार्ग विस्तारेल तेव्हा मेट्रो स्टेशनशी कनेक्ट होणारी बससेवा पीएमपीएलला करावी लागेल. त्याचे नियोजनही जलदगतीने करावे लागेल. पुण्यातील वाहतूक पोलिसांना अनेक वाहतूक नियम घालून दिले आहेत. त्यांच्या कामाचे मूल्यमापन डिजिटल माध्यमांमार्फत केले जात आहे. कामावर येताना, जाताना त्यांना वाहतुकीच्या ठिकाणी सेल्फी काढावी लागते.

दररोज तो फोटो वरिष्ठांकडे पाठवावा लागतो. याचप्रमाणे पीएमपीचे कामगार हजर किती आहेत? त्यांना नेमून दिलेल्या कामावर ते काम करतायत की नाही हे आधुनिक तंत्रज्ञानाने जाणून घेण्याची गरज आहे. त्यामुळे कामचुकारांना आळा बसेल आणि पीएमपीच्या सेवेत शिस्त येईल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये