विमानतळाचे जुने टर्मिनलही कात टाकणार
पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलनंतर आता जुन्या विमानतळाच्या इमारतीचा पुनर्विकास केला जाणार आहे. यासाठी विमानतळ प्रशासनाकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत.
त्यामुळे लवकरच या जुन्या टर्मिनलच्या कामाला सुरवात होणार आहे. यानंतर जुनी आणि नवीन इमारत जोडली जाणार आहे. त्यामुळे प्रवासी क्षमता वाढण्यास मदत होईल. तसेच गैरसोयही दूर होण्याची अपेक्षा आहे.
पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मिनलच्या विकासासाठी २५ कोटी रूपये मंजूर केले आहेत. पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल सुरू झाले आहे.
त्यामध्ये जुन्या टर्मिनलमधून नवीन टर्मिनलमध्ये विमान कंपन्या टप्प्या-टप्प्याने हलविण्यात येत आहेत. सध्या १२० विमानांचे उड्डाण व अगमण नवीन टर्मिनलमधून होत असून लवकरच सर्व सेवा नवीन टर्मिनलमध्ये हलविण्यात येणार आहे.
त्यानंतर जुने टर्मिनल बंद करून त्याचा विकास केला जाणार आहे. जुन्या टर्मिनलच्या विकासासाठी २५ कोटी रूपये मंजूर झाले आहेत.
त्यानुसार विमानतळ प्रशासनाकडून जुन्या टर्मिनलच्या विकासासाठी निविदा काढल्या आहेत. पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मिनलच्या आगमनचे रुपांतर निर्गमन प्रवेशव्दारामध्ये केले जाणार आहे.
मार्च २०२५ चे “टार्गेट’
येथील चार बॅगेच बेल्ट काढून टाकण्यात येणार आहेत. तसेच, प्रवासी सुविधा अधिक चांगल्या करण्यासाठी १६ चेक-इन काऊंटर, पाच एक्सरे मशीन, प्रवाशांना थांबण्यासाठी नवीन सिक्युरिटी होल्ड एरिया तयार केला जाणार आहे.
नवीन टर्मिनलमध्ये सध्या ३४ चेक-इन काऊंटर असून जुन्या टर्मिनलमध्ये १६ चेक-इन काऊंटर असल्यामुळे त्यांची संख्या ५० होणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या रांगा कमी होणार आहेत. जुन्या टर्मिनलचे काम मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.