थिएटर कलाकारांचा एकमेव महोत्सव

भारतीय कला आणि संस्कृती ही कायमच तिच्या सहिष्णू धर्मासाठी प्रसिद्ध आहे. या संस्कृतीचा वारसा जपण्याचा प्रत्येक कलाकार प्रयत्न करीत असतो. हा वारसा ज्या मंदिरातून सुरू होतो तो बालगंधर्व रंगमंदिरातूनच.

भारतीय कला आणि संस्कृती ही कायमच तिच्या सहिष्णू धर्मासाठी प्रसिद्ध आहे. या संस्कृतीचा वारसा जपण्याचा प्रत्येक कलाकार प्रयत्न करीत असतो. हा वारसा ज्या मंदिरातून सुरू होतो तो बालगंधर्व रंगमंदिरातूनच. २६ जून हा नटश्रेष्ठ बालगंधर्व यांचा जन्मदिवस. याच दिवसाचे औचित्य साधून हा महोत्सव साजरा केला जातो. बालगंधर्व रंगमंदिर हे भारतातील एकमेव कलामंदिर आहे जिथे प्रत्येक कलाकार हा दिवस उत्सव असल्यासारखा साजरा करतो. कलाकारांनी कलाकारांच्या कौतुकासाठी बनवलेलं व्यासपीठ म्हणजे हा ‘बालगंधर्व परिवार’ आणि हा महोत्सव आहे. रंगमंदिराच्या ४० व्या वर्धापनदिनापासून या महोत्सवाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. कारण सर्वच कलावंतांचे दैवत असणाऱ्या बालगंधर्व यांचा आहे जन्मदिवस आणि हा दिवस कलाकारांनी साजरा करायलाच हवा. याचनिमित्ताने सर्व कलाकार या बालगंधर्व नाट्यगृहामध्ये जमतात. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञ आपला कार्यक्रम बालगंधर्व व्यासपीठावर सादर करतात. कोणी नाट्य, कोणी लावणी, कोणी एकपात्री, तर कोणी अभिनय या रंगभूमीवर सादर करत असतो.

खरेतर मार्च ते मे हा कालावधी प्रत्येक कलाकारासाठी प्रचंड धावपळीचा असतो. कारण गावोगावीच्या यात्रा-जत्रा या ठिकाणी कलाकाराला आपली कला दाखवत असतात. या रोजच्या धावपळीमध्ये आपल्या सहकारी कलाकारांना व अन्य लोकांना भेटण्यासाठी एक छोटेखानी स्नेहमेळावा केला जावा, यातून हा महोत्सव सुरू झाला आणि गालिब म्हणाल्याप्रमाणे
मैं अकेलाही चला था जानिब-ए-मंज़िल मगर
लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया …
छोटेखानी वेलीचा हा वटवृक्ष आज दिसतो आहे, तो बालगंधर्व रंगमंदिर महोत्सवाच्या माध्यमातून. सुरुवातीला केवळ एक दिवस हा महोत्सव साजरा केला जायचा, परंतु सर्वच कलाकारांच्या मागणीप्रमाणे हा उत्सव आता तीन दिवस साजरा करतात… काही काळाने या उत्सवाचे स्वरूप हे मनोरंजनापुरते न राहता कलाकारांच्या समस्या सोडविण्यासाठीदेखील पुढाकार घेणारे ठरले.
एखाद्या कलाकाराचा मृत्यू झाला किंवा अपघात झाला तर त्याला मदत करणे, कलाकाराचे आरोग्य विमा काढणे, एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मागे राहिलेल्या कुटुंबीयांना मदत करणे अशा प्रकाराच्या अन्य कार्यांमध्येदेखील हा परिवार पुढे येऊ लागला. मनोरंजन करूया, म्हणून झालेली सुरुवात हळूहळू काळजी करण्यापर्यंत पोहोचली, हे या परिवाराचे सर्वात मोठे यश आहे.
आता या उत्सवाचे पंधराव्या वर्षांमध्ये पदार्पण होत आहे, तर प्रत्येक पुणेकरासह सर्वच कलाकारांचे हा उत्सव कधी सुरू होतो, याकडे लक्ष असते.

आतापर्यंत हजारो-लाखो कलाकार या बालगंधर्व रंगभूमीमध्ये घडलेत. प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते, की एकदा तरी बालगंधर्वच्या स्टेजवर आपली कला दाखवायची संधी मिळावी. इथे सुरुवात झालेले अनेक मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीमधे किंवा छोट्या-मोठ्या टीव्ही सिरियलमध्ये काम करीत असणारे कलाकार आहेत. आज सुप्रसिद्ध अभिनेते -अभिनेत्री म्हणून काम करीत आहेत. तरीही इथून गेलेला प्रत्येक कलाकार हा इथं भेट देण्यासाठी नक्की येतोच. या महोत्सवाचे विशेष हेच आहे, की हा कलाकारांनी कलाकारांसाठी स्वखर्चातून सुरू.केलेला महोत्सव आहे. इथे कोणी लावणी सादर करतो, तर कोण वैचारिक बाजू सांभाळतो. कोणी मुलाखती, एकपात्री, नाटक अशा वेगवेगळ्या भूमिका निभावत असतो, तर कोणी गायनाच्या माध्यमातून आपली सेवा देतो. ही सर्व मंडळी कोणत्याही प्रकारचं मानधन घेत नाहीत. विनाशुल्क इथे येऊन कार्यक्रम करतात, मनोरंजन करतात. उदा.सांगायचं झालं तर आज हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या कॉमेडी आणि अभिनयाने सर्वांना भुरळ ज्यांनी घातली ते जॉनी लिव्हर असतील किंवा गायक सुदेश भोसले असोत किंवा मराठी चित्रपटसृष्टीत नावाजलेले अनेक कलाकार असोत, हे या ठिकाणी येऊन नक्कीच भेट देतात.

या सगळ्यांसोबतच बालगंधर्व परिवाराकडून जीवनगौरव पुरस्कार दिला जातो. तसेच अन्य पुरस्कारही दिले जातात. विशेष म्हणजे कलाक्षेत्राच्या या झगमगाटात अनेक चेहरे काळोखामध्येच राहतात. त्या पडद्यामागील कलाकारांची दखल फारशी कोणी घेत नाही. मात्र बालगंधर्व परिवार याला अपवाद आहे. तसंच गेल्या अनेक वर्षांपासून बालगंधर्व परिवारतर्फे कलेचा सन्मान केला जातो. त्यासाठी बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार कलाकाराला त्याच्या भूमिकेसाठी दिला जातो. त्याने एक कलाकार म्हणून जगलेल्या व्यक्तीला दिला जातो. तसाच यावर्षीदेखील हा जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला असून तो २६ जूनला प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये यावर्षीचा पंधरावा जीवनगौरव पुरस्कार हा ज्योती चांदेकर यांना देण्यात येणार आहे. सर्वच कलावंतांना खऱ्या अर्थाने इथे न्याय मिळतो, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. बालगंधर्व महोत्सव हा एक सर्वसमावेशक महोत्सव तर आहेच, पण पुणेकरांच्या हृदयात याला विशेष स्थान आहे. अशा या महोत्सवाचे हे ५४ वे वर्ष आहे. हा वारसा असाच अखंड वाढत राहो, हीच नटराजाचरणी प्रार्थना…

Nilam: