मागील विधानसभा निवडणुकीत केवळ २ ते ५,००० मताधिक्याने काठावरील विजय मिळवलेल्या महायुतीच्या पाच आमदारांसह तीन-तीन टर्म ठाण मांडून बसलेल्या भाजपा आमदारांच्या विरोधातील वातावरणामुळे महायुतीच्या छातीत धडकी भरली आहे. त्यातच भारतीय जनता पक्षातील काही महत्त्वकांक्षी कार्यकर्त्यांमुळे आप्तस्वकीयांच्या लाथाळ्यांची जणू काही स्पर्धा लागली असून श्रेष्ठींसाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेनेची एकत्रित ताकद काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे . तर शिंदे शिवसेना निष्प्रभ आहे.
खडकवासला :
खडकवासलात मतदार संघात आ. भीमराव तापकीर यांची तब्बल चौथी टर्म आहे . मागील वेळी ते सुमारे दोन हजार मताधिक्याने कसेबसे विजयी झाले. हा मतदारसंघ आता महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे . तेथे रूपाली चाकणकर तसेच दिपाली धुमाळ यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत परंतु त्यांचा पूर्णवेळ हा अजितदादांच्या दौऱ्यात आणि प्रदेश पातळीवर जातो . त्यामुळे मतदारसंघात त्यांचा पहिल्यासारखा ‘ कनेक्ट ‘ राहिला नाही . त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या मान्यवरांना दोन – दोन महिने त्यांची अपॉइंटमेंट देखील मिळत नसल्याचे दिसते . त्यांच्या संपर्क कार्यालयात अपॉइंटमेंट साठीची नोंदणी , फोन नंबर … असे हाय प्रोफाईल डाटा कलेक्शनचे काम होते . त्या पलीकडे तेथे सामान्यांना ‘ आधार ‘ मिळत नाही ..
लोकसभा निवडणुकीत येथे शरद पवार गटाचे सचिन दोडके यांनी केलेल्या चांगल्या कामाची पावती मिळाली असून या मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटालाच चांगली मते मिळाली आहेत. त्यामुळे महायुतीचा उमेदवार येथे धोकादायक पातळी मध्ये असल्याचे मानले जाते.
कॅन्टोन्मेंट :
भाजपा आमदार सुनील कांबळे यांचा मागील वेळी सुमारे ५,००० मताधिक्याने त्यांचा विजय झाला. यावेळी तेथे काँग्रेस नेते रमेश बागवे यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. शिवाय काँग्रेस , शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष एकत्रित निवडणूक लढवीत आहेत. तेथे सदानंद शेट्टी यांचाही आग्रह आहे. परंतु बागवे हे उमेदवारी मध्ये बाजी मारतील असे दिसते .
बहुसंख्य झोपडपट्टी आणि दलित वस्तीचा बहुभाग असलेल्या या भागात बागवे यांचा वरचष्मा आहे . सुनील कांबळे हे केवळ पक्षश्रेष्ठी समोर मिरवणारे आणि प्रत्यक्षात नागरी समस्यांबाबत निष्क्रिय असणारे आमदार म्हणून त्यांची बदनामी येथे मोठे प्रमाणात होत आहे.
शिवाजीनगर :
सिद्धार्थ शिरोळे हे युवक आमदार आणि परंपरागत राजकारणी असले तरी केवळ पाच हजार मताधिक्याने मागील वेळी त्यांचा विजय झाला आहे . यावेळी आदित्य माळवे , नीलिमा खाडे यासारख्या भाजपा अंतर्गत प्रतिस्पर्ध्यांचेच त्यांच्यासमोर आव्हान आहे. शिरोळे यांना जरी उमेदवारी मिळाली तरी खाडे , माळवे यांच्या असंतोष गृहीत धरता त्यांना लढाई करावी लागणार आहे. कोथरूड सारख्या मतदार संघात वारे माप मंत्रीपदे , प्रदेश पातळीवरील पदे दिली परंतु भाजपाने शिवाजीनगर वर नेहमीच अन्याय केला अशी येथील कार्यकर्त्यात भावना आहे . वैयक्तिक शिरोळे हे देखील फारसे सक्रिय नसतात तसेच त्यांचा तळागाळातील लोकांशी दैनंदिन संपर्क कमी आहे. काँग्रेस चे दत्ता बहिरट हे तेथे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत.
वडगाव शेरी :
सुनील टिंगरे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार मागील वेळी सुमारे ५,००० मताने विजयी झाले होते. परंतु पोर्से कार प्रकरणांमध्ये त्यांची असलेली अनावश्यक दखलबाजी आणि गुन्हेगारीला साथ देण्या च्या प्रवृत्तीमुळे मतदार संघात त्यांच्याविरुद्ध वातावरण असल्याचे बोलले जाते.
येथे जगदीश मुळीक यांनी लोकसभेसाठी खूप तयारी केली होती . परंतु त्यांना उमेदवारी नाकारली गेली . आता ते विधानसभेसाठी इच्छुक आहेत . मात्र यंदा देखील पुन्हा टिंगरे यांना उमेदवारी मिळणार असेल तर येथील भाजप कार्यकर्ते किंवा विशेषतः मुळीक यांना मांणणारा वर्ग मनापासून प्रचारास सहभागी होणार नाही असे बोलले जाते.
हडपसर :
चेतन तुपे यांनी मागील वेळी सुमारे ५,००० मताधिक्याने विजयश्री मिळवली होती आता त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. तेथे योगेश टिळेकर यांनी उमेदवारीसाठी दावा केला होता , परंतु त्यांना विधान परिषद दिल्यामुळे आता भाजपा ही जागा पुन्हा चेतन तुपे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीला देईल असे दिसते . येथे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वतीने प्रशांत जगताप यांची उमेदवारी निश्चित मानली जाते . परंतु प्रशांत जगताप हे सर्वसामान्यांना अपील होणारा चेहरा नाही शिवाय केवळ पक्षश्रेष्ठींच्या दौऱ्यात अत्यंत सक्रिय आणि सामान्यांकरता ‘ नॉट रिचेबल ‘ अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारासाठी पोषक वातावरण दिसते. शिवसेना शिंदे गटाने देखील या मतदार संघाची मागणी केली आहे . पण त्यांच्याकडे येथे सक्षम आणि चारित्र्यसंपन्न उमेदवार नाही.
पर्वती :
माधुरीताई मिसाळ यांनी गेली तीन टर्म येथे आमदारकी भूषवली . तेथे श्रीनाथ भिमाले आणि राजेंद्र शेळीमकर हे प्रमुख उमेदवारीसाठीचे प्रतिस्पर्धी आहेत. शिवाय माधुरी मिसाळ यांना मिळणारे लाखोचे मताधिक्य गेल्या टर्मपर्यंत 30 हजारापर्यंत खाली आले होते . त्यामुळे येथे बदल हवा हे पक्षांतर्गत अनेकांचे मत आहे . परंतु मनी , मसल पॉवर मध्ये माधुरी मिसाळ या भिमाले आणि शिळीमकर यांच्या पेक्षा वरचढ ठरतात .
येथे महाविकास आघाडी कडून देण्यात येणाऱ्या उमेदवारांमध्ये सौ . कदम , काका चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत परंतु ते फारसे प्रभावी उमेदवार दिसत नाहीत . येथे महायुतीला पोषक वातावरण आहे परंतु भाजपाला अंतर्गत संघर्षाला सामोरे जावे लागणार आहे.
कोथरूड :
पुण्याचे पालकमंत्री राहिलेले चंद्रकांत दादा पाटील यांच्या बद्दल झालेल्या उपऱ्या उमेदवाराचा प्रचार खोडून काढत 25 हजाराचे लीड घेत दादांनी मागील विधानसभा घेतली . परंतु त्यावेळी सर्वच पक्षांचे त्यांना सहकार्य होते. यंदा येथे पृथ्वीराज सुतार हे शरद पवार गटाकडून त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी मानले जातात . भाजपा अंतर्गत येथे बरीच नाराजी आहे. ठराविक कार्यकर्त्यांच्या चक्रव्यूहात अडकलेले दादा येथे अनेक नागरिक समस्यांना न्याय देऊ शकले नाहीत . कोथरूडला भाजपाने भरभरून दिले परंतु खरोखरच मतदानात त्याचा उपयोग होणार आहे का ? याबद्दल भाजप कार्यकर्ते देखील संभ्रमात आहेत.
ज्येष्ठतेचा दंभ नको सामान्यांचा कळवळ असणारा आमदार हवा असा येथील कार्यकर्त्यांचा सूर आहे.
कुठलीही प्रमुख ताकत नसताना देखील मागील वेळी किशोर शिंदे या मनसेच्या उमेदवाराने चंद्रकांत दादा यांना चांगली टक्कर दिली होती. शिवसेनेचा देखील येथे एक वर्ग आहे तो यंदा भाजपासोबत नाही. शिवसेना शिंदे गटाची ताकद येथे काहीच नाही.
कसबा :
भाजपाला धडा शिकवल्यानंतर देखील कसब्यातून अजूनही पक्षाने काही शहाणपण शिकले नाही असेच दिसते. खरंतर लोकसभेच्या मानसिकतेचा फायदा घेत येथे भाजपला पोषक वातावरण असू शकते परंतु हेमंत रासने यांच्या बद्दल अजूनही प्रचंड नाराजी आहे. धीरज घाटे हे खूप वर्षांपासून प्रतीक्षेत आहेत. त्यांनी येथे आपला खास वर्ग निर्माण केला आहे . स्वरदा बापट यादेखील इच्छुक आहेत . कुणाल टिळक यांनी मध्यंतरी भावनिक पोस्ट लिहित , ‘ माझी आई असती तर हा पराभव झाला नसता … ‘ असे व्यक्त होत स्वतःसाठी न्यायाची याचना केली आहे .
आता रासने यांना पुन्हा उमेदवारी दिली तरी येथे बहुसंख्य असलेले हे उच्चवर्णीय मतदार आणि इच्छुकांचे कार्यकर्ते आणि त्यांच्याशी अटॅचमेंट असलेले मतदार नाराज होतील. ते ‘ बदललेल्या भाजपा ‘ ला दूरच ठेवतील अशी शक्यता आहे. रवी धंगेकर यांचा करिष्मा कमी झाला आहे परंतु सातत्याने चर्चा आणि वैयक्तिक गाठीभेटीमध्ये ते सक्रिय आहेत .