मुलाविरुद्ध सज्ञान समजून खटला चालविण्याची पोलिसांची मागणी
कल्याणीनगर अपघात प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या मुलाविरुद्ध सज्ञान समजून त्याच्याविरुद्ध खटला चालविण्याची मागणी करणारा अर्ज पोलिसांनी बाल न्याय मंडळात (जेजीबी) दाखल केला आहे.
कल्याणीनगर अपघात प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या मुलाविरुद्ध सज्ञान समजून त्याच्याविरुद्ध खटला चालविण्याची मागणी करणारा अर्ज पोलिसांनी बाल न्याय मंडळात (जेजीबी) दाखल केला आहे. अपघातातील मोटार आणि मुलाचे पारपत्र परत मिळावे, म्हणून अगरवाल कुटुंबीयांनी अर्ज केला आहे. पुणे पोलीस, तसेच अगरवाल कुटुंबीयांच्या अर्जावर २६ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
मुलाला सज्ञान ठरवून खटला चालवायचा असेल तर पोलिसांनी मुलाला बाल न्याय मंडळात हजर केल्यापासून ३० दिवसांत तपास अहवाल (आरोपपत्र) दाखल करणे बंधनकारक आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोलिसांनी वेळेत अहवाल सादर न केल्याने मुलाला जामीन मंजूर झाला. अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात बदल केल्याप्रकरणी त्याचे बांधकाम व्यावसायिक वडील विशाल, आई शिवानी, ससूनमधील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर, तसेच साथीदार येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.
कल्याणीनगर भागात १९ मे रोजी भरधाव मोटारीने संगणक अभियंता तरुण-तरुणीला धडक दिली. अपघातात दोघांचा मृत्यू झाला. अपघात प्रकरणात पोलिासांनी जप्त केलेली मोटार परत मिळवण्यासाठी अगरवाल कुटुंबीयांनी न्यायालयात अर्ज केला आहे. मुलाचे पारपत्र पोलिसांनी जप्त केले आहे. पारपत्र परत मिळवण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. या अर्जावर बुधवारी (२८ ऑगस्ट) न्यायालयात सुनावणी होणार होती. सुनावणी पुढे ढकलण्यात आली. पुणे पोलीस आणि अगरवाल कुटुंबीयांच्या अर्जावर २६ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.