ताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाचशे कोटींचा प्रश्न! अवताडे विरुद्ध परिचारक हा सुप्त संघर्ष नव्याने सुरू

आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभेमध्ये पंढरपूरच्या विकासासाठी खर्च झालेल्या 500 कोटी रुपयांचा मुद्दा उपस्थित केला आणि भाजपा अंतर्गत राजकारणाचे रान पेटले. विकास आणि राजकारण या दोन्ही पैलूंच्या माध्यमातून हा प्रश्न महत्त्वाचा होता.

एक तर अवताडे यांनी जे निवेदन सभागृहामध्ये केले त्यामध्ये सत्यता किती? या दृष्टीने जर पाहिले तर प्रत्येक पंढरपूरकरांच्या मनामध्ये हे शंभर टक्के ‘सत्य वचन’ असल्याचे लक्षात येते. अवताडे यांच्या या वक्तव्याबद्दल कोणीही शंका उपस्थित करणार नाही किंवा त्याला विरोधही करणार नाही.

कोट्यावधी रुपयांचे आकडे वर्तमानपत्रातून दिसून येतात , परंतु प्रत्यक्षात हे गाव खाच – खड्यांनी आणि खड्डे चिखलांनी भरलेले माखलेले आहे , ही वस्तुस्थिती आहे. 500 कोटींचा निधी खर्च करत असताना त्यामध्ये कमालीचे गैर नियोजन होते हा प्रमुख मुद्दा खरं तर असायला हवा होता. कारण बांधलेली शौचालय, अपूर्ण राहिलेले घाट, यमाई तलावाचे काम तेथे लागून उभे असलेल्या तुळशी वृंदावनाचे निकृष्ट काम, अर्धवट घाट बांधणी मंजूर केलेल्या पुलाच्या तांत्रिक मंजुरीसाठी झालेला खर्च परंतु पुढे रखडलेले काम अशा अनेक कंगोऱ्यातून या प्रश्नाकडे पाहिले पाहिजे . निधी खर्च झाले परंतु ते अर्धवट स्थीतीमध्ये झाले . त्यामुळे या कामांचे पूर्णत्व आणि त्याचा लाभ नागरिकांना घेता आला नाही. याशिवाय रस्ते दुरुस्ती , काँक्रीट रस्त्याची बांधणी ड्रेनेज आणि पाणीपुरवठा यावर मात्र पूर्ण खर्च होऊन देखील त्याचाही लाभ लोकांना घेता आला नाही . हे पाप मात्र शंभर टक्के पंढरपूर नगरपालिकेचे असल्याचे म्हणता येईल . कारण हा निधी प्रत्यक्षात खर्च झाला पण काही ठेकेदार आणि त्यांच्या पडद्यामागे नगरसेवकच जगले . केवळ राजकारण सांभाळायचे म्हणून परिचारक यांनी त्यांच्यावर ती कृपा केली, परंतु त्याचवेळी पंढरपूरच्या विकासाला खड्ड्यात घातले गेले ही वस्तुस्थिती आपण नाकारू शकत नाही.

समाधान आवताडे यांच्या या प्रश्नानंतर अवताडे विरुद्ध परिचारक हा सुप्त संघर्ष नव्याने सुरू झाल्याचे दिसते . अवताडे यांच्या या प्रश्नामागे परिचारक यांना अडचणी मध्ये आणण्याचे किंवा त्यांना विलन ठरविण्याचे षडयंत्र असल्याचे देखील चर्चेले गेले. परंतु शासनाकडूनच अर्धवट आलेला निधी आणि काही प्रमाणामध्ये राजकारणाची मजबुरी या पाठीमागे आहे हे नाकारता येणार नाही. तरी देखील समाधान आवताडे यांनी उपस्थित केलेला प्रश्न हा तसा धाडसाचाच मांनला पाहिजे. उद्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा आपल्यालाच उमेदवारी मिळणार आणि परिचारक गट आपलाच प्रचार करणार हे त्यांनी गृहीत धरलेले दिसते. परिचारक यांची दिवसेंदिवस होत चाललेली पीछेहाट आणि अवताडे यांचा बळावत चाललेला विश्वास याचे हे द्योतक असावे.

परंतु याही पलीकडे अवताडे हे देखील लोकप्रतिनिधी म्हणून फारसे प्रभावी ठरले नसल्याचे देखील स्पष्ट आहे. पंढरपूरकडे ढुंकून न बघणारा हा नेता आज दीड – दोन वर्षे निवडणुकीला राहिल्यानंतर तोंड उघडतो आहे . पंढरपूरच्या अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत . आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये ते सोडविण्याचा अवताडे यांनी प्रयत्न केला नाही , ही देखील वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही.

कॅरीडोर , वाळवंटातील घाट बांधनी , यमाई तलावाचा विकास , नगरपालिकेचे घरकुल प्रकरण , ड्रेनेज पाणीपुरवठा भुयारी गटार यासाठीचा प्रलंबित निधी , दगडी पूलाला पर्यायी ठरणाऱ्या पुलाचे बांधकाम , याशिवाय तर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेले घोटाळे आणि उपनगरातील लोकांच्या समस्या हे तर पूर्णतः वेगळीच गोष्ट आहे त्याकडे देखील अवताडे यांनी कधीही ढुंकुन पाहिले नाही.

लोकसभेमध्ये निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील संघर्ष आणि विधानसभेमध्ये परिचारक विरूद्ध आवताडे संघर्ष या केवळ राजकीय मनोरंजनाच्या गोष्टी झाल्या , परंतु आमच्या विकासाची जबाबदारी कोणी घेणार आहे का नाही ? या प्रश्नाचे उत्तर मात्र पंढरपूरकरांना मिळत नाही.

-अनिरुद्ध बडवे

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये