राणा दाम्पत्याचा कोठडीतील मुक्काम वाढला; सत्र न्यायालयाकडूनही दिलासा नाही

मुंबई : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई हायकोर्टानंतर सत्र न्यायालयाने देखील दिलासा देण्यास नकार दिला आहे. तसंच राणा दाम्पत्याने मुंबई हायकोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. राजद्रोहाच्या गुन्ह्यात जामीन मिळावा यासाठी राणा दांपत्याचा प्रयत्न होता. यावेळी राज्य सरकारने कोर्टाकडे तीन दिवसांचा अवधी मागितला. कोर्टाने यानंतर राज्य सरकारला २९ एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश देत त्यानंतर पुढील सुनावणी करु असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राणा दांपत्याचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.
राणा दाम्पत्याला प्रक्षोभक विधाने करून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याप्रकरणी खार पोलिसांनी अटक केली आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात राजद्रोहाचा (भादंवि कलम १२४ अ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच पोलिसांशी हुज्जत घालून सरकार कामात अडथळा आणल्याप्रकरणीदेखील गुन्ह्यांची नोंद केली आहे.
सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी दंडाधिकारी न्यायालयात प्रकरण प्रलंबित असून जामीन अर्जावर कोणतीही सुनावणी झाली नसताना सत्र न्यायालयात दाद कशी मागू शकतात असं सांगत तीन दिवसांचा अवधी मागितला होता. यावेळी कोर्टाने राज्य सरकारला उत्तर देण्यासाठी तीन दिवसांची वेळ दिली आहे.