ताज्या बातम्यापुणे

कात्रज- कोंढवा रस्ता रुंदीकरणाचा ‘मार्ग’ मोकळा

नागरिक आणि वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत असलेला कात्रज ते कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचा ‘ मार्ग’ मोकळा होण्याची शक्यता आहे, गल्ली ते दिल्लीपर्यंत या रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सात जागा मालकांनी जागा देण्यास मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे खुद्द केंद्रिय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी त्यासाठी महापालिका प्रशासनाला आश्वासन दिले आहे, त्यामुळे या मार्गावरील वाहतूककोंडी सुटण्यास मदत होणार आहे.

या रस्त्यावरील काही भागात समतल विलगकाचे (ग्रेड सेपरेटर), तसेच रस्ता रुंदीकरणाचे काम टप्प्याटप्प्यात केले जात आहे. रस्ता तयार करण्यासाठी सात जागा मालकांनी तयारी दाखविली असून त्याचे प्रस्ताव पालिकेकडे देण्यात आले आहेत. तसेच रस्त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी एक खिडकी योजना सुरू केली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली.

वाहतुकीच्या समस्येमुळे चर्चेत असलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी या रस्त्याचे रुंदीकरण केले जात आहे. या कामाला अधिक वेगाने गती देण्यासाठी पालिका प्रशासनाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. रस्त्याच्या कामासाठी सात जागामालकांनी आपले प्रस्ताव पालिकेकडे सादर केले असून, याची तपासणी करून ही जागा तातडीने ताब्यात घेण्याचे नियोजन पालिकेने केले आहे.

या रस्त्यावर पालिकेच्या वतीने उड्ढाणपूल बांधला जात आहे. यासाठी आवश्यक असलेल्या २८० मीटर रस्त्याचे तातडीने भूसंपादन करण्यासाठी पालिकेने प्राधान्य दिले आहे. या पुलासाठी आवश्यक ती भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून पालिकेने प्रस्ताव सादर केल्यास रस्ता तयार करण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी महापालिकेला दिले आहे. काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी या रस्त्याच्या कामासाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेत चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी पालिकेला मदत करण्याचा शब्द दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये