शिंदे गटानं पक्षासाठी दिला ‘या’ तीन नावांचा पर्याय

मुंबई | Shivsena Symbol – शिदे गटानं पक्षासाठी निवडणूक आयोगाकडे तीन नावांचा पर्याय दिला आहे. शिंदे गटानं निवडणूक आयोगाला सादर केलेल्या तिन्ही नावांमध्ये बाळासाहेब यांचा उल्लेख आहे. त्यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. निवडणूक आयोगानं शिवसेना हे मुख्य नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर पर्यायी नावांचा प्रस्ताव सादर करण्यासाठी आज (10 ऑक्टोबर) दुपारी एक वाजेपर्यंतची मुदत ठाकरे आणि शिंदे गटाला दिली होती.
शिंदे गटानं निवडणूक आयोगाला सादर केलेल्या नावांमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना बाळासाहेबांची असे तीन पर्याय देण्यात आले आहेत. यापैकी शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावाचा प्रस्ताव ठाकरे गटानंदेखील दिला आहे. त्यामुळे शिवसेना-बाळासाहेब ठाकरे हे नाव निवडणूक आयोग रद्द करण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग कोणता निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, ठाकरे गटानं पर्यायी तीन निवडणूक चिन्हांचा पर्याय दिला होता. यामध्ये त्रिशुळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल हा पर्याय दिला आहे. तर शिंदे गटानंदेखील उगवता सूर्य, त्रिशुळ आणि गदा या चिन्हांचा पर्याय दिला आहे.