‘खाशाबा’ चित्रपटाची कथा वादाच्या भोवर्यात
मुंबई | Khashaba Movie – दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी घोषित केलेल्या खाशाबा जाधव यांच्या चित्रपटातील कथा वादाच्या भोवर्यात सापडली आहे. मूळ कथालेखक संजय दुधाणे यांची असताना मंजुळे यांनी रणजीत जाधव यांच्याशी करार केल्याने हा वाद निर्माण झाला आहे.
कोरोनापूर्वी 2019 मध्ये दिग्दर्शक मंजुळे यांनी चित्रपटाबाबत खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजीत जाधव यांच्याशी करार केला होता. मुळात रणजीत जाधव यांनीच यांनी 30 ऑगस्ट 2013 रोजी कराड येथे पत्रकार परिषद घेऊन खाशाबांच्या चित्रपटाची कथा ही संजय दुधाणे यांची असल्याचे घोषित केले होते. आता रणजीत जाधव यांनी संमती करार केल्याने हा वाद निर्माण झाला आहे.
ही बाब लेखक संजय दुधाणे यांच्या लक्षात येताच मंजुळे यांना नोव्हेंबर 2020 मध्ये खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजीत जाधवची पुण्यात भेट घेतली होती. यावेळी वाईचे पटकथालेखक तेजपाल वाघही उपस्थित होते. मैत्रीपूर्ण वातावरणात चर्चा झाल्यानंतर रणजीत जाधव यांनी हा गुंता सोडवावा असे मंजुळे यांनी सांगितले होते.
रणजीत जाधव यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न आल्याने 26 डिसेंबर 2022 मध्ये दुधाणे यांनी मंजुळे यांना नोटिस पाठवली होती. त्यानंतर 5 जानेवारी 2023 रोजी रणजीत जाधव यांनी त्यांच्या 2 वकिलांसोबत दुधाणे यांची पुणे येथे भेट घेऊन सहकार्य करण्याची विनंती केली होती. दरम्यान, जिओ स्टेडियोजने खाशाबा चित्रपटाची घोषणा केल्याने मंजुळे यांच्या पुणे येथे स्टेडिओत 6 जुलै 2023 रोजी रणजीत जाधव यांच्या वकिलासह एकत्रित समझोता बैठक घेतली. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.
या बैठकीला जागतिक क्रीडा प्रशिक्षक रणजीत चामले व पत्रकार विठ्ठल देवकाते उपस्थित होते. नागराज मंजुळे यांच्या आटपाट प्रोडक्शनने रणजीत जाधव यांच्यासोबत केलेल्या करारामधून 25 टक्के रक्कम दुधाणे यांना देण्याबाबत निर्णय झाला. सकारात्मक बैठकीत 1 लाख रूपये मी देतो असेही मंजुळे यांनी घोषित केले. रणजीत जाधव यांनी संजय दुधाणे यांच्याबाबत पुन्हा उदासीनता दाखविल्याने दुधाणे यांनी आटपाट व जिओ स्टेडिओला नोटिस पाठवली आहे.