पाण्यापासून वंचित असलेल्या सांगलीतील ६५ गावांना मिळणार लाभ; उपसा सिंचन योजनेला अखेर गती
सांगली | Sangli News – सांगलीतील (Sangli) जत तालुक्यातील पाण्यापासून वंचित 65 गावांना सिंचनाचा लाभ देण्यासाठी प्रस्तावित असलेल्या म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेचे काम अखेर सुरू करण्यात आले आहे. जत पूर्व भागातील 65 गावांसाठी 1 हजार 928 कोटी रुपये खर्चाच्या विस्तारित म्हैसाळ म्हणजेच जत उपसा सिंचन योजनेस सरकारकडून मंजुरी दिली होती. कामाच्या पहिल्या टप्प्याचे 981 कोटी 60 लाख 92 हजार रुपयांचे कामास सुरुवात झाली.
ज्या भागातून ही योजना जाणार त्या मार्गावर पाईपचा कार्यक्षेत्रावर पुरवठा सुरु करण्यात येत आहे. पाणी द्या अन्यथा कर्नाटकात जाऊ, असा इशारा दिल्याने या भागातील सिंचन योजनेचे काम सुरु करण्यचे सरकारने आश्वासन दिले होते. या म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून 57 किलोमीटर अंतरापर्यत पाणी पोचविले जाणार आहे. म्हैसाळ योजनेच्या टप्पा क्रमांक तीनच्या संतुलन जलाशयांमधून पाणी उचलून एकूण 57 किलोमीटर अंतरावर असलेल्या जत तालुक्यातील मौजे येळदरी पर्यत जवळपास 740 मीटर उंचीवर पाणी पोहचवले जाणार आहे. या योजनेचे काम 2 वर्षांमध्ये पूर्ण करण्याचे नियोजित आहे.
जत तालुक्यापर्यंत जाणार पाणी
मूळ म्हैसाळ योजनेच्या टप्पा क्रमांक तीनच्या संतुलन जलाशयांमधून पाणी उचलून एकूण 57 किलोमीटर अंतरावर जत तालुक्यातील मौजे येळदरी येथे भूतलांक 740 मीटर उंचीवर पाणी पोहोचविले जाणार आहे. मिरज, कवठेमहांकाळ तालुक्यातून जत तालुक्यापर्यंत जाणार आहेत. या नलिका कामाची मौजे आरग व लोणारवाडी येथे सुरुवात करण्यात आली.