पुण्यातील प्राचीन मंदिरात चोरी; 250 वर्ष जुन्या चांदीच्या मूर्ती व मखर घेऊन चोरटे पसार
पुणे | पुण्याच्या सदाशिव पेठेतील खजिना विहीर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चोरी झाल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी मंदिरातील कपाटाचे कूलूप तोडून चांदिच्या मूर्ती व मखर चोरून नेले आहे. या प्रकरणी तीन अज्ञात चोरट्यांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौरव ज्ञानेश्वर सिन्नर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 8 मार्च रोजी पहाटे 3 वाजता तीन अज्ञात चोरांनी मुख्य दरवाज्याचे कूलूप तोडून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी गाभाऱ्याचेही कुलूप तोडले व चांदीची विठ्ठल- रुक्मिणीची मूर्ती, गणपतीची चांदीची मूर्ती व चांदीचे मखर असे एकूण 41 हजार 500 रुपयांच्या वस्तू चोरून नेल्या. चोरट्यांनी मंदिरातील कपाटाचेही कुलूप तोडले होते. घटनेनंतर चोरटे दुचाकीवरुन प्रसार झाले.
चोरी झाल्याची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरु करण्यात आला आहे. तपासादरम्यान पोलिसांनी मंदिरातील सीसीटिव्हीचे चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक फरताडे करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार खजिना विहीर विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे पुण्यातील प्राचीन मंदिरांपैकी एक म्हणून ओळखले जाते. या मंदिराला 250 वर्ष जूना इतिहास आहे. आता याच मंदिरातील प्राचीन मूर्ती चोरीला गेल्याने पोलिसांसमोर चोरांना शोधून त्या मूर्ती परत मिळवण्याचे आव्हान आहे.