ताज्या बातम्यापुणे

पुण्यात चोरट्याने सराफाचे दुकान लुटले; बघता बघता बाहेर गेला अन् छोटे छोटे दगड घेऊन…

पुणे | शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच पुण्यातील भवानी पेठेतून चोरीची घटना समोर आली आहे. भरदिवसा एका चोरट्याने हातचलाखी करत एका ज्वेलरला तब्बल 5 लाखांचा गंडा घातला आहे. या चोरट्याचा सगळा कारनामा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. 69 ग्रॅमचे दागिने घेऊन पसार झालेल्या चोरट्याच्या विरोधात खडक पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे आता खडक पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.

भवानी पेठेतील एका ज्वेलरच्या दुकानात दुपारच्या सुमारास एक इसम ग्राहक बनून आला. या इसमाने आधी त्या दुकानात 1 ग्रॅम सोने खरेदी केले. त्यानंतर त्याने दुकानदाराला आणखी काही दागिने दाखवायला सांगितले. दुकानदाराने त्याला जवळपास 69 ग्रॅम दागिने दाखवले. हा इसम दागिने बघता बघता बाहेर गेला. छोटी छोटी दगड आपल्या खिशात टाकून आत आणले. दुकानदाराचे लक्ष नसताना ते छोटे दगड दागिन्यांच्या पाकिटात ठेवले आणि दागिने बघत बघत हळूच त्याने ते दागिने खिशात टाकले. त्यानंतर फोनवर बोलण्याचे नाटक करत दुकानदारासमोर बसून राहिला आणि 5 मिनिटात फोनवर बोलत असल्याचे भासवत दुकानातून निघून गेला. बराच वेळ झाला तरी हा इसम दुकानात परत आला नाही. त्यानंतर दुकानदाराला चोरी झाल्याचं लक्षात आलं.

दुकानात चोरी झाल्याचं लक्षात येताच दुकानदाराने खडक पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि चोरट्याच्या विरोधात तक्रार दाखल केली. दुकानदाराच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून चोरट्याचा शोध सुरू केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये