पुण्यातून जिल्हाधिकारी राजेश देशमुख बोलत असल्याचे सांगून, राजस्थानमधील चोरट्याने केली 70 हजारांची फसवणूक
पुणे | शहरात सायबर क्राईमच्या (Cyber Crime) घटना सातत्याने वाढत आहेत. त्यात सामान्य नागरिकांनंतर अधिकाऱ्यांवरही या सायबर चोरांची नजर आहे. मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या नावे फेसबुक किंवा अन्य सोशल मीडिया (Rajesh Deshmukh Pune ) अकाउंटवर अधिकाऱ्यांच्या नावे फेक अकाउंट उघडले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून सायबर चोरट्यांच्या रडारवर पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या नावाने फेक अकाउंट (Fake Facebook Account) तयार करण्यात आले होते. अशातच आता सायबर चोरट्यांच्या जिल्हयाधिकारी राजेश देशमुख बोलत असल्याचे सांगून एकाची स्वस्तात फर्निचर विक्रीच्या बहाण्याने फसवणूक केली असून आरोपीला पोलिसांनी राजस्थान येथून अटक केली आहे.
शाहरूख काटुला खान (वय 23) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी खान याच्यासह सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने जिल्हाधिकारी राजेश देशमुख बोलत असल्याचे भासवत तक्रारदाराला फोन केला. या साठी व्हॉटसअप कॉल करण्यात आला. आरोपीने जिल्हाधिकारी राजेश देशमुख बोलत असल्याची बतावणी करत त्यांचा मित्र संतोषकुमार केंद्रीय सुरक्षा दलात नियुक्तीस असून त्याला जुने फर्निचर विकायचे आहे, अशी बतावणी केली. तक्रारदार यांना खरच जिल्हाधिकारी बोलत असल्याचा भास झाला. त्यांनी फर्निचर खरेदीसाठी ऑनलाइन पद्धतीने 70 हजार रुपये घेतले. त्यानंतर फर्निचर पाठविले नाही. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तक्रारदाराने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त आर. एन. राजे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे-पाटील, उपनिरीक्षक तुषार भोसले, राजकुमार जाबा, नवनाथ जाधव, निलेश लांडगे, शाहरुख शेख आदींनी तपास केला. आरोपी खान राजस्थानातील अलवर येथे असल्याचे समजले. यावेळी पथक पाठवून त्यांना अटक करण्यात आली. नागरिकांनी असे फोन आल्यास खातरजमा करून व्यवहार करावे असे आवाहन करण्यात आले आहे.