या देवी सर्वभूतेषु ,मातृरुपेण संस्थीता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्ये नमो नमः

शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील प्राचीन काळापासून चालत आलेला उत्सव आहे.पूर्वी तो कृषीविषयक लोकोत्सव होता. पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करत असे. घटस्थापनेपासून या उत्सवाला प्रारंभ होतो. शरद ऋतूच्या प्रारंभी हा उत्सव सुरू होतो म्हणून त्याला शारदीय नवरात्रोत्सव म्हटले जाते.
या उत्सवात देवीच्या शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धीदात्री या रूपांची पूजा केली जाते. देवीने नवरात्राचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला, महिषासुर राक्षसाचा वध केला म्हणून तिचे नाव महिषासुरमर्दिनी असे रूढ झाले. वाघावर आरुढ झालेल्या हातात तलवार आणि शस्त्र घेतलेल्या शक्ती रूपाची नवरात्रीत पूजा केली जाते. नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काळ आहे आणि या काळात आपल्यात नवी शक्ती, नवा उत्साह, नवी उमेद निर्माण होते .
या नऊ दिवसांत उपासना, यज्ञ केल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
काळ्या मातीवर धान्य टाकून ते जेव्हा उगवायला सुरुवात होते त्या वेळी त्यावर दररोज वेगवेगळ्या फुलांच्या माळा सोडल्या जातात. त्यामध्ये पहिली माळ शेवंती किंवा सोनचाफ्याची म्हणजेच पिवळ्या फुलांची असावी, तर दुसऱ्या माळेत अनंत, मोगरा, चमेली, तगर ही पांढरी फुले वापरावी.
गोकर्णीच्या निळ्या फुलांनी देवीचा तिसरा दिवस प्रसन्न व्हावा तर केशरी अथवा भगवी फुले नवरात्राची चौथी माळ सजवतात. बेलकुंदाची फुले पाचव्या तर कर्दळीची फुले सहाव्या माळेला वापरावीत. झेंडूची फुले सातवी माळ सजवतात तर तांबडी फुले वापरून नवरात्रात देवीची आठवी माळ सजते. असा हा प्रघात अजूनही समाजात काही ठिकाणी आहे.
देवीचे सजलेले रूप, त्यावर दररोज वेगवेगळ्या रंगांच्या सुगंधी फुलांच्या माळा, हा सगळा साज शृंगार आणि टाळ मृदंगासहित होणाऱ्या देवीच्या महाआरती हे सर्वच देहभान विसरायला लावते.
नवरात्र उत्सव भारतभर साजरा केला जातो त्यामध्ये विविधता आहे आणि त्या त्या राज्यातील लोक आपल्या प्रथा परंपरांप्रमाणे हा उत्सव साजरा करतात.पूजेच्या विधींमध्ये विविधता आहे मात्र त्यामधून देण्यात येणाऱ्या संदेश मात्र एकच असतो. नवरात्र हा विविधतेचा उत्सव आहे. पूर्व ,पश्चिम, उत्तर आणि दक्षिण या चारही भागात हा उत्सव साजरा केला जातो.
उत्तर भारतात नवरात्र उत्सव रावणावर प्रभू रामचंद्रांचा विजय म्हणून साजरा केला जातो दसऱ्याला रामलीला नाट्याचे सादरीकरण करून ह्या उत्सवाची सांगता होते, तर पश्चिम भारतात विशेषतः गुजरात राज्यात नवरात्रीचा उत्सव गरबा आणि या दांडिया रासच्या माध्यमातून साजरा केला जातो.
गरबा हा नृत्याचा एक सुंदर प्रकार आहे प्रत्येक व्यक्तीची गरबा, दांडिया खेळण्याची स्टाईल वेगवेगळी पण अत्यंत आकर्षक असते. पूर्व भारतात नवरात्र उत्सव पश्चिम आणि उत्तर भारतापेक्षा भिन्न आहे. पश्चिम बंगाल आणि भारताच्या ईशान्येकडील राज्यात नवरात्रीचे शेवटचे पाच दिवस दुर्गा पुजा होते. ह्या मुर्तींचे पाच दिवस पूजन करून नदीत विसर्जन केले जाते.
दक्षिण भारतातही हा उत्सव मोठ्या आनंदाने भक्ती भावाने साजरा केला जातो. दक्षिण भारतात नवरात्रीमध्ये मित्र नातेवाईक आणि शेजाऱ्यांना घरी वेगवेगळ्या बाहुल्या आणि छोटे पुतळे यांचे प्रदर्शन असलेला कोलू बघायला आमंत्रित केले जाते.
कर्नाटकात नवरात्र म्हणजे दसरा नवरात्रीच्या नऊ रात्री पुराण कथेतील संदर्भांवर आधारित रात्रभर चालणारे नाट्य आणि नृत्य कार्यक्रम सादर केले जातात.
दृष्टांवर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून मैसूर दसरा साजरा केला जातो. दक्षिण भारतात बऱ्याच भागात महानवमीच्या दिवशी आयुध पूजा केली जाते.पुस्तके, संगीत, वाद्ये, उपकरणे, यंत्रे, वाहने यांची या दिवशी पूजा केली जाते. आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देणाऱ्या सर्व अवजारांचा सन्मान करणे आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयुध पूजा करण्यात येते. यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते ती म्हणजे, पांडवांना तेरा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवासात पाठवण्यात आले होते.
हा वनवास सुरू करण्याआधी त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर लपवली होती, पूराणांमधुन असे दाखले सापडतात की अर्जुनाने ही शस्त्रे विजयादशमीच्या दिवशी परत आणली, त्यामुळे या दिवशी शुभ कार्याचा आरंभ करण्याची प्रथा सुरू झाली.
नवरात्रीमध्ये रंग ,संगीत आणि नृत्य यांची रेलचेल असते. यामधून आपल्या आत नवीन ऊर्जा निर्माण होते. नवरात्रीचा काळ हा ध्यान धारणेला उपवासाची जोड देत व्यतीत केला जातो कारण उपवासामुळे मनाची अस्वस्थता कमी होते.
आपल्यातील शांतता आणि प्रसन्नता वाढते श्री श्री रविशंकर जी म्हणतात की सर्व धर्मात प्रार्थनेसोबत उपवासाची जोड दिली आहे कारण जेव्हा तुम्ही उपवास करतात तेव्हा अंतरबाह्य तुम्ही शुद्ध होता आणि तुम्ही करत असलेल्या प्रार्थना गहिऱ्या होतात. खरंच खूप मोठा संदेश यामधून आपल्याला मिळतो आणि नवरात्रींचा हा उत्सव एक वेगळी ऊर्जा देऊन जातो.
श्वेताविनायक .