हा मार्ग एकला…

पक्ष पुढे नेणे ही खर्गे यांच्या दृष्टीने तारेवरची कसरत असेल, त्यांच्यासोबत काँग्रेस परिवार वगळता फार कोणी मदतीला असेल असे सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे स्वतःच मार्ग तयार करून त्यावर वाटचाल करणे हा एकमेव पर्याय त्यांच्यासमोर आहे.
आखेर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक २४ वर्षांनंतर पार पडली. १३५ वर्षांपेक्षा अधिक अत्यंत देदीप्यमान इतिहास असणाऱ्या काँग्रेसला अखेरीस अध्यक्ष मिळाला. काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद ही एक अत्यंत महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेचे पद आहे इतिहासात डोकावले, तर अध्यक्षपदावर ज्या व्यक्ती विराजमान झाल्या होत्या. विशेषत: पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापर्यंत जी परंपरा अध्यक्षपदाची होती, ती भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाशी अत्यंत निगडित आणि महत्त्वाची अशीच आहे. भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास या व्यक्तींच्या कार्यकर्तृत्वाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशा काँग्रेसच्या अध्यक्षपदावर मल्लिकार्जुन खर्गे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. काँग्रेस पक्ष अत्यंत संक्रमणाच्या परिस्थितीतून वाटचाल करत आहे.
सन २०१४ पासून काँग्रेसची अवस्था दिवसेंदिवस ढासळत गेलेली पाहायला मिळते. कोणाच्या तरी सहकार्याने राज्याराज्यांमध्ये स्थान टिकवणे आणि अस्तित्व राखणे अशी काहीशी अवस्था त्यांची पाहायला मिळते. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे ही परिस्थिती कमी होईल आणि काँग्रेसला काही प्रमाणात अच्छे दिन येतील, अशी अपेक्षा आणि आशा काँग्रेसजनांना आणि काँग्रेस पाठीराख्यांना आहे. काँग्रेसचे नक्की काय चुकले किंवा चुकते याचा ऊहापोह करणाऱ्या गटांमधील शशी थरूर यांच्यासारखा अत्यंत हुशार, तडफदार, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आवाका असणारा काँग्रेसचा अध्यक्षपदाचा उमेदवार या निवडणुकीत पराभूत झाला. एका अर्थाने युवा काँग्रेसच्या दृष्टीने ही मोठी हानी आहे. पारंपरिक आणि जुन्या विचारसरणीचा पगडा असणारी विचारधारा काँग्रेस पक्ष यापुढे चालवणार आहे. अर्थात ही विचारधारा मल्लिकार्जुन खर्गे यांची स्वतःची असेल असे नाही. याचे कारण खर्गेंपेक्षा काँग्रेस पक्ष गांधी परिवाराला अधिक महत्त्वाचे मानतो.तशी प्रथा आहे.
सन २००४ ते २०१४ या कालखंडात पंतप्रधानपदी डॉ. मनमोहन सिंग असले, तरी निर्णय आणि सत्तेचे समांतर केंद्र सोनिया गांधी होत्या, हे नाकारून चालणार नाही. काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष खर्गे असले, तरी निर्णय प्रक्रियेमध्ये गांधी परिवाराचा हस्तक्षेप किंवा वरचष्मा राहणारच आहे. किंबहुना शशी थरूर बंडखोर प्रवृत्तीचे असल्यामुळे त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष करून गांधी परिवाराला नव्या वादाला जन्माला घालायचे नव्हते, हेही नक्की! शशी थरूर यांच्या बाजूने सैफुद्दीन सोज यांसारखी मंडळी आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशमधील मतदानासंदर्भात स्पष्ट नापसंती व्यक्त केली आहे. थोडक्यात, पक्षामध्ये यानंतरच्या कालखंडात वैचारिक फूट पडेल का, असाही प्रश्न निर्माण होतो. थरूर यांचा केरळ, तसेच दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये प्रभाव आहे आणि ते खरोखरच नाराज असतील, तर भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने या राज्यांमध्ये शिरण्यासाठी त्यांना संधी आहे. काँग्रेस पक्ष आपला अजेंडा कधीच स्पष्ट ठेवत नाही. अशोक गेहलोत यांना अध्यक्ष करण्याचे ठरवून ज्या प्रकारे राजकारण आणि क्रिया-प्रतिक्रिया येत राहिल्या, त्यावरून स्पष्ट असा अजेंडा न ठेवणे हे काँग्रेसला महागाचे पडते. त्यामुळे कायम अनिश्चिततेच्या भोवऱ्यात काँग्रेस पक्ष सापडलेला दिसतो. ठाम निर्णय न घेण्याचे अनेक तोटे आणि दुष्परिणाम काँग्रेसला सहन करावे लागले आहेत.
याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेत अध्यक्षपदाच्या निवडीसाठी तातडीने निर्णय न घेतल्यामुळे महाविकास आघाडीला सत्तेतून पायउतार व्हावे लागले, हेही आहे. थोडक्यात, ९८०० काँग्रेस जनांनी मतदान केले आणि त्यात खर्गे यांना ७८९७ मते मिळाली. थरूर यांना १९२१ मते मिळाली. काँग्रेस पक्ष आपल्या नेत्याचे, विशेषतः गांधी घराण्याचे किती ऐकते हा त्याचा वस्तुपाठ आहे. खर्गे यांना यापुढे काँग्रेस एकसंघ करणे, अत्यंत धोरणात्मक मात्र धाडसी निर्णय घेणे, २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेसची लोकसभेतील संख्या वाढवणे, यापुढच्या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यांमध्ये काँग्रेसला सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे अशी थेट नजीकची आव्हाने आहेत. गांधी घराण्याला सांभाळत काँग्रेस जणांना चुचकारणे आणि पक्ष पुढे नेणे ही त्यांच्या दृष्टीने तारेवरची कसरत असेल. त्यांच्यासोबत काँग्रेस परिवार वगळता फार कोणी मदतीला असेल, असे सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे स्वतःच मार्ग तयार करून त्यावर वाटचाल करणे हाच एकमेव पर्याय त्यांच्यासमोर आहे. मार्ग एकल्यानेच चालायचा आहे.