मुंबईला पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याची धमकी; मुंबईसह इतर शहरांना सतर्क राहण्याचा इशारा
मुंबई | मुंबईला पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्याचा मेल आल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)च्या ईमेल आयडीवर हा धमकीचा मेल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. धमकीचा मेल आल्याने यंत्रणेला सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
NIA हा धमकीचा मेल गुरुवारी रात्री आल्याने देशातील इतर शहरांनाही अलर्ट करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे मुंबई पोलिसांनाही सूचना देण्यात आली असून पोलिस आणि इतर तपास यंत्रणांकडून कसून तपास करण्यात येत आहे.
NIAला आलेल्या मेलमध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यात येणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. तसंच, मेल करणाऱ्या व्यक्तीने तो स्वतः तालिबानी असल्याचा दावा केला आहे. व तालिबान संघटनेचा प्रमुख नेता सिराजुद्दीन हक्कानी हा आदेश दिला असल्याचंही यात नमूद करण्यात आलं आहे.