भिवंडीत अग्नितांडव! तीन गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचं सामान जळून खाक
भिवंडी | Bhiwandi Fire : भिवंडीत (Bhiwandi) मोठं अग्नितांडव (Fire) पाहायला मिळालं. तीन गोदामांना भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. भिवंडीमधील राहणाळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गोविंद कंपाउंड येथील केमिकल गोदामाला आग लागली. या आगीमध्ये लाखोंचं सामान जळून खाक झालं आहे.
आगीची ही घटना दुपारच्या सुमारास घडली आहे. यामध्ये केमिकल साठवून ठेवलेले दोन गोदाम आणि चप्पलचे एक गोदाम अशा तीन गोदामांना आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीनं घटनास्थळी पोहोचल्या असून सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
या दुर्घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. तर आता अग्निशामक दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. तसंच भिवंडी शहरात आगीच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. तसंच या आगीच्या घटनांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
दरम्यान, भिवंडीमध्ये दहा दिवसांपूर्वीच दालमिल कंपाऊंड परिसरात आग लागल्याची घटना घडली होती. तर एका केमिकल गोदामाला देखील भीषण आग लागली होती, त्यामुळे तेथील परिसरात एकच खळबळ उडाली होती.