पुणेमहाराष्ट्रशेत -शिवारसिटी अपडेट्स

मुसळधार…

महाराष्ट्रात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात ठरलेल्या तारखेपेक्षा उशिराने आलेल्या मोसमी पावसाने पश्चिम महाराष्ट्र कोकण विदर्भ आणि मराठवाडा या सर्व क्षेत्रात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. पावसाच्या दोन दिवसांच्या मार्‍याने सर्व नद्या ओढे नाले आणि रस्ते भरून वाहू लागले आहेत. पावसाने कोकणाला सर्वाधिक झोडपले असून, अनेक नद्या इशारा पातळीच्या वरून वाहत आहे. अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेवर अचानक ताण निर्माण झाला आहे तरीसुद्धा यामधून मार्ग काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन चे जवान सज्ज झाले आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यात एनडीआरएफ चे पथक दाखल झाली आहेत. जोरदार पावसामुळे अनेक भागातील नद्या या इशारा पातळीला समांतर व काही नद्या इशारा पातळीच्या वरून वाहत आहेत…

पाणी कपात टळणार-

पुणे : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या चारही धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. पुण्यामध्ये रात्रभर झालेल्या पावसामुळं पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या चारही धरण क्षेत्रामध्ये चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. ज्यामुळं या धरणाची पाणी पातळी चांगलीच वाढली आहे. त्यामुळे पुणेकरांवर जे पाणी कपात लागू करण्यात आली आहे ती लवकरच दूर होण्याची शक्यता आहे.

सिंहगड रस्ता-

रस्त्यावरून चालत जाणेही झाले मुश्किल

सिंहगड रस्ता परिसरातील कोल्हेवाडी फाटा ते मंत्रा निवासी संकुल हा रस्त्यावर पावसामुळे खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यावरून चालत जाणे देखील मुश्कील झाले आहे. त्यातच सध्या या परिसरात दमदार पाऊस पडत असून, या रस्त्यांवरील खड्यांमध्ये पाणी साचून राहत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. काही दुचाकीचालक खड्यांत पडून जखमी झाले आहेत. त्यामुळे खड्यांत रस्ता की रस्त्यात खड्डे, असे म्हणण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे. पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात कोल्हेवाडी फाटा ते मंत्रा निवासी संकुल हा रस्ता केवळ ७०० मीटरचा आहे. या परिसरात १५ हजारांहून अधिक नागरिक राहावयास आहेत. मात्र, या भागातील रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. या रस्त्याच्या कामाला मुहूर्त कधी लागणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. कोल्हेवाडी फाटा या रस्त्याच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ८६ लाख ८९ हजार रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला.

मात्र, स्थानिकांनी आम्हाला जागेचा मोबदला मिळाला नसल्याचे सांगत या रस्त्याच्या कामाला विरोध केल्याने हे काम रखडले. पूर्वी खडकवासला व किरकटवाडी या दोन्ही ग्रामपंचायतीच्या हद्दीवरील रस्ता असल्याने यावरुन स्थानिकांत जागेवरून वाद होता. मात्र, आता दोन्ही गावे महापालिकेत समाविष्ट झाली आहेत. रस्त्यावर अनेक वाहनचालक जखमी झाले आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यावरून चालत जाणे देखील मुश्कील झाले आहे. याबाबत रस्त्याची डागडुजी करून होणारी गैरसोय टाळावी. याबाबत महापालिकेला निवेदन दिले आहे. या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करून कामास सुरुवात देखील करण्यात आली होती. मात्र, येथील स्थानिकांनी ठेकेदाराशी जागेवरून वाद निर्माण करून काम बंद पाडले. सर्व स्थानिकांनी सहकार्य केले तर रस्ता करण्यास अडचण येणार नाही.

वडगाव बुद्रुक

वडगावात रस्तारुंदीकरण कामाचा राडारोडा नाल्यात– वडगाव बुद्रुक येथील पाउंजाई मंदिराजवळील नाल्यात म्हशीच्या गोठ्यामागे मोठ्या प्रमाणावर मातीचा राडारोडा टाकण्यात आला आहे. हा राडारोडा नवले ब्रिज ते कात्रजपर्यंत होणार्‍या रस्तारुंदीकरण कामाचा आहे. या राडारोड्याने नाल्यातील वाहणार्‍या पाण्याच्या प्रवाहाला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. मागील झालेल्या महाप्रलयात या ओढ्याला मोठा पूर आला होता. या पुराच्या पाण्यामुळे मोठी जीवितहानी होऊन अनेक घरे व इमारतींची पडझड झाली होती. तशाच प्रकारची संभाव्य धोकादायक परिस्थिती नाल्यात टाकलेल्या राडारोड्यामुळे निर्माण झाली आहे. हा नाला नन्हे, आंबेगाव भागातून वाहत येतो. या नाल्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती आहे. नाल्याला पूर येण्याची शक्यता असल्याने नाल्यात टाकलेला राडारोडा त्वरित उचलावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

..तसेच मागील पाच तासात शहरात तब्बल 13 ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याने, पुणेकर नागरिकांना नाहक वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले आहे. दत्तवाडी पोलीस चौकीजवळ, शिवणे शिंदे पुल, टिंगरेनगर, गल्ली क्रमांक 6, लुल्लानगर, भवानी पेठ, मनपा वसाहत क्र 10, औंध, आंबेडकर चौक, प्रभात रोड, लेन नं 14, नवीन सर्किट हाऊस, नाना पेठ, अशोका चौक, कळसगाव, जाधव वस्ती, हडपसर, क्वालिटी बेकरीजवळ, कोथरुड, मयुर कॉलनी आणि, गुळवणी महाराज रस्ता या 13 ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. त्याच दरम्यान एका ठिकाणी आगीची घटना घडली आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यात यश आले असल्याचे अग्निशामक विभागा मार्फत सांगण्यात आले आहे.

लोणावळा

लोणावळा शहरात २४ तासांत कोसळला १६६ मिमी पाऊस

लोणावळा : लोणावळा शहरात २४ तासांत तब्बल १६६ मिमी पावसाची नोंद झाली असून, येथील पर्यटनाचे मुख्य आकर्षण असलेले भुशी धरण आज बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ओव्हरफ्लो झाले आहे. यामुळे शनिवार आणि रविवारी लोणावळा शहरात पर्यटनासाठी येणार्‍या पर्यटकांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे, मात्र यासाठी पोलिसांची मेहेरनजर असणं आवश्यक असणार आहे. सोमवारी आणि मंगळवारी दिवसभर आणि रात्रीदेखील मुसळधार पडणार्‍या पावसाने बुधवारीदेखील जोर कायम ठेवल्याने येथील डोंगर भागातून मोठमोठे धबधबे वाहू लागले आहेत. यामुळे आकाराने लहान असलेल्या भुशी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली आणि भुशी धरण दोनच दिवसांत ओव्हरफ्लो झाले आहे. स्थानिक युवकांनी धरणाच्या सांडव्यावरील दोन मोर्‍यांची माती काढत धरणातील पाण्याला सांडव्यावरून वाहण्यासाठी वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केला, मात्र फ्लो जास्त असल्याने ते शक्य झालं नाही. सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांत लोणावळा शहरात एकूण २५१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

आंबेगाव बुद्रुक

रस्त्यावर मैलामिश्रित सांडपाणी

आंबेगाव बुद्रुक गावठाणातील सांडपाणी वाहिन्याची दुरावस्था झाली असून परिसरातील रस्त्यावर मैलामिश्रीत सांडपाणी वाहते आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाली असल्याने, ग्रामस्थांच्यावतीने धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयावर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. द्वारकाई निवास ते शिवालय दरम्यान असणारी ड्रेनेज लाइन एप्रिल महिन्यापासून चोक अप झाली असून त्यातून मैलायुक्त सांडपाणी रस्त्यावर वाहते आहे. द्वारकाई आणि शिवालयसह इतर पाच सोसायटीमध्ये साधारण ऐंशी कुटुंब वास्तव्यास आहेत. धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय महापालिका कार्यालयाकडे ग्रामस्थांच्या वतीने वारंवार अर्ज विनंत्या केल्या जात आहेत. पालिकेकडून दिखाऊ काम केले जाते परंतु यावर ठोस पाऊल महापालिका उचलताना दिसत नाही. साचलेल्या आणि रस्त्याने वाहणार्‍या सांडपाण्यामुळे सोसायटीतील लहान मुले मोठ्याप्रमाणावर आजारी पडल्याचेही ग्रामस्थ सांगत आहेत. तर दरवर्षी न चुकता जनतेकडून कर वसुल करणारी महापालिका मूलभूत सुविधा पुरविण्यासही समर्थ नाही. त्यामुळे महापालिकेच्या कार्यालयावर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे स्थानिकांनी सांगितले. आंबेगाव बुद्रुक गावठाणातील सांडपाणी वाहिन्या ह्या २००२ मध्ये ग्रामपंचायतकडून टाकण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर, सप्टेंबर २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टी दरम्यान गावातील सर्व ड्रेनेज लाइन चोक अप झाल्या होत्या. त्यावेळची लोकसंख्या पाहता ग्रामपंचायतकडून टाकण्यात आलेल्या सांडपाणी वाहिन्या चोक अप होत नव्हत्या. आता आंबेगावची लोकसंख्या मोठ्याप्रमाणावर वाढली आहे.

पवना धरण माहिती
वर्तमान पाणी पातळी = 600.55 मीटर.
वर्तमान स्टोरेज = 16.85 %
24 तास पाऊस = 98 मिमी या वर्षी
एकूण पाऊस = 337 मिमी.
पाणी सोडणे = शून्य
हायड्रो डिस्चार्ज = 965.80 क्युसेक
(०९०० ते १४४५)

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये