पिंपरी चिंडवडमध्ये रस्त्यांवर खोदकाम; वाहतूक कोंडीत भर
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत स्पाईन रोड ते यमुनानगर परिसरात रस्ते खोदकामाला परवानगी दिली असताना संबंधित ठेकेदाराने तळवडे, रुपीनगर परिसरातील सगळ्याच रस्त्यांवर खोदकाम सुरू केले आहे. महापालिका फ क्षेत्रीय स्थापत्य विभागाकडून स्पाईन रोड ते यमुनानगर या रस्त्यावर ओ.एफ.सी. केबल दुरुस्तीसाठी मे. जिओ डिजिटल फायबर प्रा. लि. यांना रस्ते खोदकामाला परवानगी दिली आहे.
शहरातील अनेक भागातदेखील संबंधित ठेकेदार कंपनीकडून खोदकाम सुरू आहे. मात्र ठेकेदाराने नियम धाब्यावर बसवत या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या नाहीत. तसेच चालू असलेल्या कामाचा फलक नियमानुसार लावलेला नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी व अपघात होत आहेत. जिथे-जिथे रस्ते खोदण्यात आले आहेत, तिथे तत्काळ डांबरी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी होत आहे. तसेच रस्त्याच्या कडेला वाहनेदेखील लावलेली असतात. त्यामुळे पादचाऱ्यांना मुख्य रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे.
शहरातील विविध रस्त्यांलगत अनेक सोसायट्या व व्यावसायिक दुकाने आहेत. त्यामुळे केबल टाकण्यासाठी रस्त्यांचे खोदकाम केले जात आहे. या कामाचा वेग अत्यंत संथ आहे. धिम्या गतीने होणाऱ्या कामाचा त्रास येथील रहिवासी व ग्राहकांना होत आहे. जागोजागी रस्ते खोदून ठेवले आहेत. त्यामुळे संपूर्ण वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. रात्रीच्या वेळी सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना न केल्याने अपघात होत आहेत.