स्वातंत्र्यलढ्यातील शहिदांना देशभक्तिपर गीतांतून मानवंदना

इंदापूर : देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या संकल्पनेतून १५ ऑगस्ट २०२२ रोजी संदीप पंचवाटकर प्रस्तुत ‘मेरा भारत महान’ देशभक्तिपर गीतांतून इंदापुरात स्वातंत्र्यलढ्यातील शहिदांना मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाला इंदापूरकरांनी मोठा प्रतिसाद दिला. १४ ऑगस्टला रात्री जिल्हाभर मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यास मोठा प्रतिसाद मिळाला. इंदापूरलाही मशाल मोर्चा माजी मंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
इंदापूर नगर परिषदेच्या जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेच्या प्रांगणात हा देशभक्तिपर गीतांचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले, देशाचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे जिल्ह्यामध्ये अगोदर १४ ऑगस्ट रोजी भव्य मशाल मिरवणूक ठेवली होती. या मशाल मिरवणुकीचा संदेश जिल्हाभर पसरल्यानंतर हीच संकल्पना पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रावर मोठ्या उत्साहामध्ये राबवण्यात आली. याचा मनस्वी सर्वांना आनंद आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त तरुणांना इतिहास माहिती होण्यासाठी देशहितासाठी राष्ट्रसेवेच्या भावनेने सर्वांना एकत्र घेऊन पाऊल टाकण्याची सर्वांना सवय तरुण पिढीला लागावी, यासाठी आज अमृतमहोत्सवानिमित्त विविध देशभक्तिपर उपक्रम मोठ्या उत्साहात राबवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मेरा भारत महान या देशभक्तिपर गीतांच्या कार्यक्रमात संदीप पंचवाडकर यांनी अत्यंत सुरेल आवाजात आणि संगीतात देशभक्तिपर गीते सादर केली.
यावेळी इंदापूर शहरातील नागरिक व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. पावसाची रिमझिम चालू असतानादेखील नागरिक कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शहरातील माजी सैनिकांच्या वतीने कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच तालुक्यातील अनेक बालकलाकार यांना व्यासपीठावर विविध कला सादरीकरणाची संधी देण्यात आली. यावेळी सर्व कलाकारांना प्रदीप गारटकर यांनी सन्मानित केले.