महाराष्ट्रातील दोन माजी पोलिस आयुक्तांची सीबीआयकडून दिल्लीत 5-6 तास चौकशी

मुंबई : काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणासंदर्भात सीबीआयकडून चौकशी अजून सुरूच आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे आणि परमबीर सिंह यांची दिल्लीमध्ये सीबीआय कडून आज (सोमवार) 5 – 6 तास चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे.
मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह आणि पोलिस निरीक्षक सचिन वाजे यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून 100 कोटी खंडणी गोळा करण्यास सांगण्यात आल्याचे गांभीर आरोप केले होते. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत न्यायालयाने ते प्रकरण सीबीआयकडे तपासणीसाठी देण्याचे आदेश दिले होते.
याआधी ईडीकडून संजय पांडे यांची 8 तास चौकशी करण्यात आली होती. त्यांच्या कुटुंबाशी संबंधित आयसेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या 18 कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहाराबाबत त्यांची चौकशी करण्यात आली होती.