पावडर विकण्याच्या बहाण्याने तो घरात घुसला, महिलेला बोलण्यात घुंतवून केले धक्कादायक कृत्य
पुणे | शहरात घरफोडी, जबरी चोरी आणि वाहनचोरीच्या गुन्ह्यांत पुन्हा वाढ झाल्याचे दिसून आले आहे. अशातच मुंढव्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रकरणी एका 50 वर्षीय महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पितळेची भांडी घासण्याची पावडर विकण्याच्या बहाण्याने घरात आलेल्या दोन व्यक्तींनी महिलेचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याचा प्रकार मुंढवा येथे घडला आहे. त्यावरून दोन अनोळखी व्यक्तींवर मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 5 ऑक्टोबरला दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मुंढव्यात बी. जी. शिर्के कंपनीजवळील कॉलनीत राहायला आहेत. घटनेच्या दिवशी महिला घरात एकटी होती. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्ती भांड्याची पावडर विकण्याच्या बहाण्याने महिलेच्या घरात आले. एका नामांकित कंपनीचे सेल्समन असल्याची त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. त्यानंतर त्यांनी महिलेला बोलण्यात गुंतवून ठेवले. महिला बेसावध असल्याचे पाहून मंगळसूत्र हिसकावले. त्यानंतर दोघांनी तेथून पळ काढला. महिलेने पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. मुंढवा पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक संदीप जोरे याचा तपास करत आहेत.