Flavoured Tea : चहा एक फ्लेवर अनेक
Flavoured Tea : चहाशिवाय अनेकांची सकाळ होत नाही. जणू चहा म्हणजे माणसाच्या जीवनातला अविभाज्य घटक झाला आहे. चहाभोवती अनेक आठवणी असतात. चहा घेतानाच अनेकांची मैत्री जमते, अनेकांचे प्रेम होते, काहींची भांडणेही होतात, तर कॉलेज लाइफमध्ये हा चहा म्हणजेच सर्वस्व असतो. अशाप्रकारे त्याच्याशी अनेक भावना निगडीत असतात.
कडाक्याची थंडी सोसत ऑफीसला जाताना थोडावेळ थांबून टपरीवरचा चहा घेणे तर अद्भूत अनूभव देते. अनेकांना तर कधीही चहा प्यावासा वाटतो. अशाच चहाप्रेमींसाठी दरवर्षी 15 डिसेंबर हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय चहा दिन म्हणून साजरा केला जातो. चहा हे भरतीयांचे आवडते पेय आहे असे म्हटले तरी चालेल. चहा प्रेमी जगभर आढळतात परंतु एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाताना चहाच्या चवीत बदल होत जातो. अशाच काही चहाच्या चवींची ओळख करून घेऊयात.
मसाला चहा
देशातल्या कोणत्याही भागात गेलात तरी सहजरीत्या हा मसाला चहा मिळतो. सध्याच्या वातावरणात सर्दी आणि खोकल्याचा त्रास असलेल्यांना मसाला चहा पिण्याचा सल्ला दिला जातो. योग्य पद्धतीने बनवलेला हा चहा रोगप्रतिकारक शक्ती तर मजबूत करतो. शिवाय सर्दी आणि खोकलाही बरा करतो.
काश्मिरी कहवा
कहवा हे काश्मीर खोऱ्यामधील एक प्रसिद्ध पेय आहे. काश्मिरीच्या बर्फवृष्टीत हा चहा एक वेगळीच एनर्जी देतो. इतर काश्मिरी पेयांप्रमाणेच हा चहा बनवायला देखील सोपा आहे. या चहात गुलाबाच्या पाकळ्यांचा समावेश असतो सर्वात महत्वाचे म्हणजे यात गोडव्यासाठी साखरेऐवजी मधाचा वापर करतात.
निलगिरी चहा
या चहाला ब्लू माउंटन टी असेही म्हटले जाते. हा चहाचे मूळ पश्चिम घाटात आहे. त्याच्या तीव्र चवदार, सुगंधी आणि रंगाच्या वैशिष्ट्यांमुळे हा चहा जगातील सर्वाधिक मागणी असलेल्यांपैकी एक आहे. याची चव थोडी गोड असली तरीही ते अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध तर कोलेस्ट्रॉल आणि संपूर्ण प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करते.
हजमोला चहा
बनारसच्या अस्सी घाटावर उपलब्ध असलेल्या हजमोला चहाची अनोखी चवही लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. सुंठ पुदिना, काळे मीठ, काळी मिरीहजमोलाच्या गोळ्या आणि लवंगा अशा मासल्यांपासून हा हेल्दी चहा तयार केला जातो. हे उकळलेल्या पाण्यात लिंबू मिसळून चहाच्या पानांसह सर्व्ह केला जातो.
दार्जिलिंग चहा
दार्जिलिंगमधील या चहाचे केवळ भारतीयच नाही तर तिथे भेट देणारे अनेक परदेशी पर्यटकही इथल्या चहाचे दिवाने आहेत. इथल्या चहाचा रंग पांढरा, काळा, हिरवा आणि ब्राऊन या रंगांचा असतो. दार्जिलिंगमधील चहामध्ये अनेकदा तीव्र सुगंध असतो. तिथे असणाऱ्या थंड वातावरण हा चहा लाभदायक ठरतो.
बटर टी
भारताव्यतिरिक्त नेपाळ आणि भूतानच्या हिमालयीन लोकांमध्ये बटर टी प्रसिद्ध आहे. यात दूधापासून बनलेले बटर, चहापत्ती आणि मीठापासून बनवला जातो. या चहाला तिबेटमध्ये पोचा म्हणूनही ओळखले जाते. सामान्य चहाच्या तूलनेत हा चहा चवीला थोडा खारट असतो. काही भागात लोणी किंवा तूप वापरून बनवला जातो.