क्रीडापुणेराष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

विवो प्रो कबड्डी स्पर्धेत यू मुंबा संघाचा निसटता विजय

तेलुगु टायटन्सची झुंज अपयशी

पुणे : मशाल स्पोर्ट्स यांच्या वतीने आयोजित नवव्या विवो प्रो कबड्डी स्पर्धेत साखळी गटात गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर असलेल्या तेलुगु टायटन्स संघाने शेवटपर्यंत बलाढ्य यू मुंबा संघाला चिवट लढत दिली. तथापि, मुंबा संघाने हा सामना ४०-३७ असा जिंकलाआणि निसटता विजय नोंदविला. पूर्वार्धात यू मुंबा संघाने चार गुणांची आघाडी घेतली होती.

शिवछत्रपती क्रीडा नगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेतील पहिल्या नऊ सामन्यांमध्ये तेलुगु टायटन्स संघाने केवळ एकच सामना जिंकला होता तर यू मुंबा संघाने पहिल्या आठ सामन्यांमध्ये पाच सामने जिंकले होते. त्यामुळे मुंबा संघाचे पारडे जड मानले जात होते. तथापि तेलुगु संघाच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच त्यांना चिवट लढत दिली. विशेषतः मुंबई संघाचे चढाईपटू कर्णधार सुरिंदर सिंग व जय भगवान यांच्या चढाया रोखण्यात त्यांना यश मिळाले. तेलुगु संघाचा खेळाडू सिद्धार्थ देसाई याने चढाई व पकडी या दोन्हींमध्ये अप्रतिम कौशल्य दाखविले. आशिष कुमार व हैदर अली एकरामी यांच्या प्रभावी चढायांच्या जोरावर मुंबा संघाने मध्यंतराला १८-१४ अशी आघाडी घेतली होती.

उत्तरार्धातही तेलुगु संघाच्या खेळाडूंनी मुंबा संघाच्या खेळाडूंना कौतुकास्पद लढत दिली. त्यांचा खेळाडू परवेश भैसवाल याने सुरेख पकडी केल्या. मात्र सामन्याच्या तिसाव्या मिनिटाला मुंबा संघाने पहिला लोण चढवीत आपली आघाडी वाढविली. त्यांच्या मोहित कुमार याने चांगल्या पकडी केल्या. शेवटची पाच मिनिटे बाकी असताना मुंबा संघाकडे पाच गुणांची आघाडी होती. मात्र चार मिनिटे बाकी असताना तेलुगु संघाने पहिला लोण चढविला आणि सामन्यातील रंगत वाढविली. मात्र चिवट लढत देऊनही सामना जिंकण्याचे त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये