पुणे : (Uday Samant On Aadity Thackeray) शिवसेनेशी बंड केलेल्या शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर 4-5 दिवसांपुर्वी कात्रज चौकात हल्ला झाला. याच ठिकाणी आदित्य ठाकरे यांची दि. २ ऑगस्ट रोजी सभा झाली होती. त्यानंतर रात्री उदय सामंत हे आपल्या ताफ्यासह या चौकातून मुंबईकडे निघाले असताना जमलेल्या लोकांकडून त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
दरम्यान, आता त्याच कात्रज चौकात उदय सामंत यांची जाहीर सभा होणार आहे अशी माहिती आहे. तानाजी सावंत, किरण साळी, नाना भानगिरे यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून सामंत यांच्याकडून देखील याला होकार देण्यात आला आहे. मात्र, वार आणि वेळ अजून निश्चित झाली नाही. यामुळे बंडखोर शिंदे गट शिवसेनेला डिवचण्याचे काम तर करत नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सामंत या ठिकाणाहून जात असताना तिथे जमलेल्या जमावाने त्यांना पाहताच गद्दार-गद्दार घोषणा देत त्यांच्या गाडीवर हल्ला केला. या प्रसंगात त्यांच्या गाडीची काच फुटली. मात्र, ज्या ठिकाणी उदय सामंत यांच्यावर हल्ला झाला, त्याच कात्रज चौकात सामंत यांची जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती शिंदे गटातील नाना भानगिरे यांनी दिली आहे.