लोकसभेसाठी भाजप शिंदे गटाचे चेहरे बदलणार? उदय सामंतांनी दिलं उत्तर, ‘देवेंद्र फडणवीस…’
मुंबई : (Uday Samant On Devendra Fadnavis) आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या पाच ते आठ जुन्या खासदारांऐवजी नव्या चेहऱ्यांची मागणी भाजपश्रेष्ठींचे मत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत, याबाबत बोलताना मंत्री उदय सांमत म्हणाले की, हे कोणी सांगितलं, भाजपचे केंद्रातील, राज्यातील नेते बोलले का? देवेंद्र फडणवीस बोलले का? प्रदेशाध्यक्ष बोलले का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
पुढे ते म्हणाले की, कोणीही याबाबत बोललेलं नाही, शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही काम करत आहे. त्यामुळे आमच्या तिकीटाचे निर्णय हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. याबाबत मित्रपक्षांशी सल्ला मसलत केली जाईल. तिन्ही नेते एकत्रित बसून पक्ष, मतदारसंघ, अदला-बदल यासंबधी चर्चा करतील, ही चर्चा सभेमध्ये किंवा जाहीररीत्या केली जाणार नाही. तिन्ही नेते परिपक्व आहेत, ते एकत्रित निर्णय घेतील, त्यामुळे कोणीही सुत्रांच्या हवाल्याने असे तर्क वितर्क लावू नये असे सांमत म्हणाले आहेत.
तिन्ही पक्षाचे नेते मिळून चांगल्या प्रकारे राज्याचा गाडा हाकत आहेत. अजित पवार युतीमध्ये आले आहेत. राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाची तिकीटे कोणाला द्यायची हे एकनाथ शिंदे ठरवणार नाहीत. ते अजित पवारच ठरवतील. त्याचबरोबर शिवसेनेत विधानसभेची आणि खासदारकीची तिकीटे कोणाला द्यायची
हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरवणार आहेत. त्यामुळे अशा गैरसमजावर आपण विश्वास ठेवू नये. आमची युती मजबूत आहे. तिन्ही नेते चांगले काम करत आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला विरोधकांना कशी मात दिली आहे. हे सर्वांनी पाहिलं आहे. त्यामुळे युतीचे तिकीट वाटप हे ज्या-ज्या जागा प्रत्येक पक्षाला येतील त्या पक्षाचे नेते करणार आहेत.
तर पुढे बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेच्या सर्व आमदार, खासदार, नेते, पदाधिकारी यांना एकनाथ शिंदेंवर विश्वास आहे. त्यामुळे तिकीट वाटपाबाबत शिवसेना पक्षाची भुमिका ही एकनाथ शिंदे यांची भुमिका असेल आणि तीच अंतिम असेल.