‘शिवसेना’ हातातून गेली अन् ठाकरे-फडणवीस आले एकत्र? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई | Maharashtra Budget Session 2023 – विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session) आता संपत आलं आहे. सध्या अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू आहे. अशातच आज (23 मार्च) विधानभवनात एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विधानभवनात एकत्र येताना दिसले. त्यामुळे आता एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे हे दोन नेते एकत्र आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
आज विधानभवनात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र दाखल झाले. विशेष म्हणजे हे दोन्ही नेते एकमेकांसोबत गप्पा मारत हसतमुखाने विधानभवनात दाखल झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरेही उपस्थित होते. त्यामुळे विधानभवन परिसरात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शिवसेनेतल्या (Shivsena) बंडानंतर आज पहिल्यांदाच फडणवीस आणि ठाकरे दोघे एकत्र दिसले. विधानभवनात दोघंही चालत येत असताना काहीतरी चर्चाही करताना दिसले. तसंच तोंडावर हात ठेवून उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना काहीतरी सांगताना दिसत आहेत. हे चित्र पाहून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
आत्तापर्यंत या दोघांना एकमेकांवर टीका करताना पाहिलं आहे. मात्र, आज हे दोघं एकत्र आल्यानं त्यांना आता त्यांची जुनी मैत्री पुन्हा आठवली का? किंवा शिवसेना हातातून गेल्यावर ठाकरे पुन्हा फडणवीसांचा हात धरणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.