“जे लोक पक्ष सोडून गेलेत त्यांना आता…”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
मुंबई | Uddhav Thackeray – ठाकरे गटाला महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे. पक्षात फूट पडल्यानंतर अनेक नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामध्ये आता ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर लगेचच माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. तर आता उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पक्षबांधणीला सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी मातोश्री येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना त्यांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर हल्लाबोल केला.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, जे लोक पक्ष सोडून गेलेत त्यांना आता जय महाराष्ट्र. आपले आणि त्यांचे संबंध तुटले आहेत. त्यामुळे आता एवढीच अपेक्षा आहे की, त्यांनी पक्षाशी गद्दारी करू नये. नाहीतर आपल्याला शिवसैनिक म्हणून त्यांच्याकडे बघावं लागेल, अशा इशाराही ठाकरेंनी दिला.
पुढे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी तुम्हाला आधी सांगितल होतं की ज्यांना जायचं आहे त्यांना जाऊ द्या. तसंच यातून एक गोष्ट लक्षात येतेय की काही लोक पक्षाला सोडून गेल्यानंतर आपल्या सागराला जास्त उधाण आलंय, मग ते रागाचं, जिद्दीचं असून आपली जिंकण्याची ईर्ष्याही वाढत आहे.