Top 5ताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्रमुंबईरणधुमाळी

संजय राऊत ठाकरेंसाठी संपले !

Rashtrasanchar Exclusive :

संजय राऊत हा विषय आता ठाकरे घराण्यासाठी संपला आहे, असे स्पष्ट संकेत मिळाले आहेत

वाचाळवीरता, नको त्या गोष्टींचा उल्लेख आणि पक्षालाच अडचणीमध्ये आणण्याची भूमिका यामुळे संजय राऊत यांचा पत्ता आता मातोश्रीवरून पूर्णपणे कापला गेल्याचे विश्वसनीय वृत्त राष्ट्रसंचारच्या हाती आले आहे. याला पुष्टी देणाऱ्या काही घटना गेल्या तीन दिवसांमध्ये घडल्या असल्याचीही नोंद राजकीय पटलावरती दिसून येते .

उद्धव ठाकरे आणि विशेषतः अशा महत्त्वपूर्ण निर्णयामध्ये मोठा सहभाग असणाऱ्या रश्मी ठाकरे यांनी आता हा निर्णय घेतला असल्याचे समजते. या पुढच्या कुठल्याही धोरणात्मक निर्णयामध्ये संजय राऊत हे नाव आता मातोश्रीच्या यादीमध्ये नसेल.

विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची निवड झाल्यानंतर ते उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांच्यामध्ये झालेला संवाद हा अनेक शिवसेना पक्ष नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ऐकला आणि त्याचीच चर्चा आता जोर धरत आहे. अंबादास दानवे यांनी चरण स्पर्श करून उद्धवजींचे आशीर्वाद घेतले आणि, ‘मला कायम मार्गदर्शन करत रहा, तुम्ही बोलाल ते करू’ असे शब्द उच्चारले. यावर उद्धवजींनी, ‘फक्त संजय राऊत होऊ नका’ असे विधान केले आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. म्हणजे संजय राऊत आणि ठाकरे परिवारामध्ये कटुता आली आहे. हे एका क्षणार्धात त्या ठिकाणी सर्वांना जाणवले.

आज मातोश्रीच्या निकटवर्तीयांना एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने याबाबत विचारले असता, त्यांनी संजय राऊत यांच्या वरती कठोर शब्दात भाष्य केले असेही समजते. अर्थात याला अधिकृत दुजोरा नसला तरी ही चर्चा झाली असल्याचे मात्र सर्वश्रुत होत आहे.

संजय राऊत यांना आपण वाऱ्यावर सोडले की काय? असे विचारता मातोश्रीच्या सूत्राकडून सांगण्यात आले की, “मुळात ते पगारी नोकर होते. संपादक होते. त्यांना मित्रत्वाचा दर्जा देऊन साहेबांनी खूप मोठे केले. आता किती दिवस त्यांच्यासाठी रडत बसायचे?” हा डायलॉग ऐकून तर शिवसेनेचा हा जेष्ठ कार्यकर्ता आवाक झाला आणि पुन्हा एकदा संजय राऊत आणि मातोश्री यांच्यामधील वाढत गेलेली दूरी स्पष्ट झाली .

राष्ट्रवादी काँग्रेसच्या चरणावर शिवसेना नेऊन बसवली असा आरोप संजय राऊत यांच्यावर नेहमीच होत होता. संजय राऊत हेच मुख्यमंत्री व्हावे अशी देखील शरद पवार यांची इच्छा होती असेही बोलले जाते. संजय राऊत यांच्या आग्रहामुळे सेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस या महाआघाडीला मूर्त रूप आले आणि शिवसेना संपविण्याला सर्वात मोठे जबाबदार हे संजय राऊतच आहेत अशी चर्चा अनेक शिवसेना नेत्यांनी केली. बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये गेलेल्या नेत्यांनी तर अनेकदा जाहीर वक्तव्य केली होती. मात्र तरीही ठाकरे यांचा संजय राऊत यांच्या वरती विश्वास कायम होता. गेल्या तीन दिवसांच्या घडामोडीमध्ये मात्र उद्धव ठाकरे यांनी सर्वांचा सल्ला ऐकण्याचे ठरवलेले दिसते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये