ठाकरेंनी मैदान मारलं! शिवाजी पार्कवर ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा? शिंदे गटाची सपशेल घेतली माघार..
मुंबई : (Uddhav Thackeray On Eknath Shinde) दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार की, शिंदे गटाला मिळणार? याची उत्सुकता संपूर्ण राज्यासह शिवसैनिकांना लागली होती. शिवाजी पार्कसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अन् शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरु होती. अखेर आज या वादावर पडदा पडला. यामध्ये शिंदे गटाने सपशेल माघार घेतली दिसून, ठाकरेंनी मैदान मारलं आहे. यासंबंधित खुद्द शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे.
शिंदे गटाचा दसरा मेळावा दक्षिण मुंबईतील क्रॉस आणि ओव्हल मैदानावर होणार असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी बोलताना दिली आहे. शिंदे गटाच्या या माघारीच्या भूमिकेमुळे ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे ठाकरे-शिंदे यांच्यातील दसरा मेळाव्याचा वाद संपल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
दरम्यान, यंदाही दसरा मेळाव्यासाठीमैदान आपल्यालाच मिळावं म्हणून ठाकरे आणि शिंदे गटाने मुंबई महानगरपालिकेकडे काही दिवसांपुर्वी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर मैदान आपल्यालाच मिळणार, असा दावाही दोन्ही गटांकडून करण्यात येत होता. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे शिवाजी पार्क मैदानाचा संघर्ष पुन्हा एकदा महापालिका आणि उच्च न्यायालयात रंगणार अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, मागील वर्षीचा धडा घेत शिंदे गटाने यंदा शहाणपण दाखवण्याने हा वाद चिघळण्याआधीच निवळला.
शिवाजी पार्कवर आपलाच दसरा मेळावा होणार असून कार्यकर्त्यांना कामाला लागावे, अशा सूचना देखील उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या. यासंबधी बोलताना उद्धव ठाकरे यांना आपण त्यांना कधीच रोखलेलं नाही. आपला मेळावा (शिंदे गटाचा) क्रॉस किंवा ऑव्हल मैदानावर होणार असल्याचं दीपक केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.