जालन्यात ‘जालियानवाला बाग कांड’ घडवला उद्धव ठाकरेंची गृहमंत्री फडणवीसांवर तोफ..

जळगाव : (Uddhav Thackeray On Eknath Shine) जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर लाठीमार झाल्यामुळे सध्या राज्यातील राजकीय राजकारण चांगलचं तापलं आहे. दरम्यान, जळगावमध्ये सभेत बोलताना माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जालन्यातील प्रकरणावर रोखठोक भाष्य केलं आहे. उध्दव ठाकरे सभेवेळी उपस्थित असणाऱ्या पोलिसांना सवाल करत, ‘येथील कोणते पोलिस आधिकारी आहेत त्यांनी सागावं तुमच्या मनाप्रमाणे शांततेत चाललेल्या एखाद्या आंदोलनात तुम्ही ताफा घुसवू शकता का?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
पुढे ते म्हणाले की, ‘असा बेछूट आणि निर्घृण लाठीमार तुम्ही करू शकता का, आंदोलकावर अश्रुधूर तुम्ही सोडू शकता का, हवेत गोळीबार करू शकता का, काय असं त्यांचं चुकलं होतं? आंदोलनाला, उपोषणाला बसलेत. पण पोलिस आले आणि त्यांना दणादणा मारत सुटले. ही परिस्थिती जशी ‘जालियानवाला बाग कांड’ झालं होतं, तसं हा नवा ‘जालनावाला’ घडविला आहे, सगळ्यांच्या तोंडी एकच नाव आहे, असंही उध्दव ठाकरे म्हणाले आहेत.
‘मराठा आंदोलनात मनोज जरांगे आंदोलनाला बसले आहेत त्यांना भेटायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. परंतू मुख्यमंत्र्यांना दिल्लीला जायला वेळ आहे. असा अमानुष अत्याचार जालियनवाला येथे झाला होता आता नवा जालनावाला घडविला आहे’, अशी खोचक टीकाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.