“समृद्धी महामार्गाचं उद्घाटन करताना मोदी आम्हाला टोमणे मारतील, कारण…”; उद्धव ठाकरेंचा टोला

मुंबई | Uddhav Thackeray – महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गाचं रविवारी (11 डिसेंबर) उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून या उद्घाटन सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. यादरम्यान, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान मोदींवर (PM Narendra Modi) निशाणा साधला आहे. ते घनसावंगीमध्ये भरलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनात बोलत होते.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाबाबत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. कर्नाटकच्या या अरेरावीवर पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. “उद्याच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी जरूर बोलावं. पण त्यांनी कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची अरेरावी यावर बोललंच पाहिजे. आख्खा महाराष्ट्र तुमच्या कर्नाटकविषयीच्या भूमिकेची वाट बघतोय”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“उद्या पंतप्रधान मोदी समृद्धी महामार्गाचं उद्घाटन करायला येत आहेत. उद्या ते राज्यपालांच्या सगळ्या वक्तव्यांवर पांघरूण घालायचा प्रयत्न करतील की छत्रपती शिवाजी महाराज कसे होते, बाळासाहेब कसे होते वगैरे बोलून आम्हाला टोमणे मारतील. कारण त्या महामार्गाचं नाव हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहे. ते त्यावर कदाचित बोलतील. माझी त्यांना विनंती आहे. बोला, तुमचा अधिकार आहे. पंतप्रधान म्हणून तुम्ही देशाचे पालक आहात. पालकासारखं बोला. पण महाराष्ट्र म्हणजे पालकाची भाजी आहे असं बोलू नका. कुणीही यावं आणि आमची भाजी करावी एवढे आम्ही काही मिंधे नाही आहोत. जे होते, ते मिंधे तिकडे गेले”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला टोला लगावला.