भविष्यातील राजकारणाचा वेध घेत, ठाकरे-आंबेडकर युतीमुळे राजकीय समीकरणे बदलणार?

मुंबई : (Uddhav Thackeray On Prakash Ambedkar) पाच महिन्यापुर्वी राज्यातील झालेल्या सत्तांतरानंतर भाजप आणि शिंदे गटाच्या कडव्या हिंदुत्त्ववादी अजेंड्याला शह देण्यासाठी गेल्या काही दिवसांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून अत्यंत नियोजनबद्ध पावले टाकली जाताना दिसत आहेत. आमचे हिंदुत्त्व हे शेंडी-जानव्याचे हिंदुत्व नाही, असा उच्चार वारंवार करत उद्धव ठाकरे बहुजनवादी हिंदुत्त्वाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत.
दरम्यान, रविवार दि. 20 रोजी प्रबोधनकार ठाकरे डॉट कॉम या संकेतस्थळाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे एकाच मंचावर असणे, त्याच दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे. यावेळी दोन्ही नेत्यांनी आगामी काळात युती करण्याचे स्पष्टपणे संकेत दिले. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी वैदिक धर्म आणि चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरेंकडून गेल्या काही काळात भाजपच्या कडव्या हिंदुत्त्ववादी विचारसरणीला टक्कर देण्यासाठी पुढे करण्यात येणाऱ्या सर्वसमावेशक हिंदुत्त्वासाठी प्रकाश आंबेडकर यांनी कालच्या भाषणातून केलेली मांडणी पूरक ठरताना दिसत आहे.
तर उद्धव ठाकरे यांनी देशात हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरु असल्याची टीका केली. हल्लीच्या दिवसात गोमांसाच्या प्रश्नावर झुंडशाहीत बळी जातात, पण महिलेवर अमानवी अन्याय अत्याचार करणाऱ्या आरोपींचा सत्कार होतो, हे आमचे हिंदुत्व आहे काय?, असा सवाल उपस्थित केला. त्यांच्या या टीकेचा रोख भाजपच्या दिशेने होता. एकूणच प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी कालच्या भाषणातून केलेली वैचारिक मांडणी परस्परांसाठी पूरक अशी होती. त्यामुळे आगामी काळात शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती होण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून वर्तविली जात आहे.
उद्धव ठाकरे सध्या प्रखर हिंदुत्त्वाऐवजी सर्वसमावेशक अशा हिंदुत्त्वाची मांडणी करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाने संभाजी ब्रिगेडशी युती केली होती. त्यानंतर आता वंचितसोबत युती झाल्यास ठाकरे गटाचा पाया आणखी विस्तारण्यास मदत होऊ शकते. राज्याच्या राजकारणात शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र झाल्यानंतर राजकीय समीकरणे बदलणार का? येत्या काळात जुळवाजुळवीच्या राजकारणाचा शिवसेनेला किती फायदा होतो हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.