स्मारकात शिवसेनेचे सर्व मुख्यमंत्री असतील, तोतयागिरी करुन मुख्यमंत्री झालेले नसतील- उद्धव ठाकरे
मुंबई : (Uddhav Thackeray Press Conference) बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीतर्फे आज बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कामाचा आढावा देण्यात आला. शिवतीर्थाजवळील महापौर बंगल्यात राज्य शासनातर्फे हे स्मारक उभारले जात आहे. या स्मारकाचे पहिल्या टप्प्यातील ५८ टक्के बांधकाम पूर्ण झालेले आहे. या स्मारकामध्ये नेमके काय असेल, याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे. असे असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या स्मारकाच्या बांधकामाला वेळ लागण्यामागचं कारण सांगितलं आहे.
वेळी माहिती सांगतांना ठाकरे म्हणाले, “काही लोकांना वाटते की स्मारकासाठी वेळ लागत आहे. जेथे स्मारक होत आहे तो महापौर यांचा बंगला आहे. हा बंगला एक वारसा वास्तू आहे. वारसा वास्तूंसाठी काही नियम असतात. सीआरझेडचाही कायदा आहे. या स्मारकाच्या बाजूला समुद्र आहे. समुद्राचा रेटा खूप जास्त आहे. समुद्राच्या पाण्यापासून, पाण्याच्या दबापासून संरक्षण व्हावे, हे लक्षात घेऊनच बांधकाम करावे लागत आहे. संग्रहालयाला काही धोका पोहोचणार नाही, याचाही विचार करावा लागत आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.
मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना ते म्हणाले, “अनेकजण मला विचारतात की इथे पुतळा कुठे असेल. मी त्यांना सांगतो की येथे पुतळाच नसेल, पुतळा म्हणजे स्मारक नाही. बाळासाहेबांचे फोटो आणून लावले. त्यांनी काढलेले कार्टून आणून ठेवले, त्यांच्या वस्तू आणून ठेवल्या म्हणजे संग्रहालय होतं. हे संग्रहालय म्हणजे स्फूर्तीस्थान असणार आहे. हे संग्रहालय म्हणजे प्रेरणा देणारे स्थान असणारे आहे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.