‘उद्धव ठाकरेंच्या माफीया सेनेनं…’; किरीट सोमय्यांचं संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर

मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर शनिवारी खार पोलीस स्थानकाबाहेर झालेल्या हल्ल्यानंतर शिवसेना आणि भाजपा याच्यातील संघर्ष शिगेला पोहचला आहे. या हल्ल्याच्या मुद्द्यावरुन दोन्ही पक्षांमध्ये आरोप- प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यादरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमय्या यांचा उल्लेख करताना टोमॅटो सॉस लावून फिरणारा माथेफिरु असं म्हटलं आहे. आता राऊतांच्या याच टीकेवर सोमय्या यांनी उत्तर दिलं आहे.
संजय राऊत यांनी मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सोमय्यांवर निशाणा साधला. “महाराष्ट्रात जे उद्धव ठाकरे, शरद पवारांना ओळखतात त्यांना इतकं लोकशाहीवादी सरकार संपूर्ण देशात नाही हे कळेल. विरोधकावंर हल्ले म्हणजे काय, कोणी एखादा माथेफिरु, वेडा स्वत:वर हल्ला झाला म्हणून ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून फिरत असेल आणि राष्ट्रपती राजवट लावा सांगत असेल तर अशा मूर्खपणाकडे दुर्लक्ष केलं पाहिजे,” असं म्हणत संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांना टोला लागवला आहे.
दरम्यान, किरीट सोमय्या यांना राऊत यांनी केलेल्या टीकेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या माफीया सेनेनं आपली हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केलाय. “उद्धव ठाकरेंच्या माफिया सेनेनं खार पोलीस स्थानकाच्या हद्दीत किरीट सोमय्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. सगळं लाइव्ह दाखवण्यात आलंय. तिसऱ्यांदा हत्या करण्याचा प्रयत्न कशासाठी केला गेला. कारण माफिया सेनेचे जितके काही छोटे-मोठे सरदार आहेत सगळ्यांचे घोटाळे बाहेर आले. अनेकांच्या प्रॉपर्टी जप्त झाल्या. अनेकांना अटक झाली, अनेक जेलमध्ये आहेत, अनेक रुग्णालयात आहेत. अमुक जामीनावर आहे. म्हणून ठाकरे सरकार कापायला लागलीय. म्हणून मनसुख हिरेननंतर किरीट सोमय्यांची हत्या करण्याचा प्रयत्न झाला.पण किरीट सोमय्याच्या पाठीशी महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेचं प्रेम आहे. उसका बाल भी बाँका नहीं होगा.”