Ujjain Rape Case : ‘माझं तोंड दाबलं, कुर्ता फाडला अन्…’ , 12 वर्षाच्या मुलीची अपबीती ऐकून तुम्हालाही येईल संताप..
Ujjain Rape Case News : “रविवारी मी रस्त्याच्या कडेला बसले होते, तेव्हा एक अनोळखी व्यक्ती माझ्या जवळ आला. त्याने माझं तोंड दाबलं, नंतर माझा गळा दाबला. माझा कुर्ता फाडला. त्याने माझ्यासोबत चुकीचं कृत्य केलं. माझ्या गुप्त अंगातून रक्तस्त्राव होत होता. मी ओरडले तेव्हा, त्याने माझा पुन्हा गळा दाबला, तोंड दाबलं. त्यानंतर तो पळून गेला. मी बेशुद्ध झाले. सकाळ झाली तेव्हा मला शुद्ध आली. मी बडनगर रोडवर मंदिराजवळून पायी जात होते, तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी मला कपडे दिले. पोलिसांना बोलावलं.” हि सर्व अपबीती बलात्कार झालेल्या 12 वर्षांच्या पीडीत मुलीची आहे.
महाकालेश्वरची पवित्र नगरी उज्जैन येथे 25 सप्टेंबर रोजी हि धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. एक अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला, त्यानंतर ती रस्त्यावर मदतीसाठी दारोदार भटकली पण कोणी तिला मदत केली नाही. तिचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. प्राथमिक उपचारानंतर मुलीला पुन्हा जीवदान मिळाले.
गुन्हा दाखल झाला तेव्हा ही तरुणी प्रयागराजची रहिवासी असल्याचं वाटत होतं. त्यानंतर मुलीने तिच्या घराचा पत्ता सतना सांगितलं. यावेळी पोलिसांनी सतना पोलिसांशी संपर्क साधला. 24 सप्टेंबरला मुलीच्या कुटुंबीयांनी तिच्या बेपत्ता झाल्याबाबत एफआयआरही दाखल केल्याचं यावेळी उघड झालं. कारण मुलगी शाळेत जाण्यासाठी घरातून निघाली होती आणि परत घरीच आली नव्हती. मुलीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी सांगितले की, मुलगी आठवीत शिकते. बेपत्ता झाल्याच्या दिवशी ती शाळेचे कपडे घालून घरातून निघाली. त्या दिवशी शाळेत शिष्यवृत्ती परीक्षा होणार होती. पण ती ना शाळेत गेली ना घरी परतली.
माहितीनुसार, ती सतना स्टेशनवरून ट्रेनमध्ये चढली आणि उज्जैनला गेली. मुलगी उज्जैन स्थानकावर पोहोचली तेव्हा ती स्थानकासमोर असलेल्या ऑटोमध्ये बसली. ऑटोचालकाने कुठे जायचं विचारलं. मुलगी सरळ चला म्हणाली. पैसेही नव्हते. त्यामुळे चालकानेही तिला उतरवलं. त्यानंतर मुलगी काही अंतर चालत पुढच्या ऑटोमध्ये बसली. या ऑटोचालकाने तिला काही अंतरापर्यंत नेले. मुलीला कुठे जायचंय हेच माहित नव्हतं. त्यामुळे या ऑटोचालकानेही तिला उतरवलं.
जेव्हा मुलगी ऑटोतून उतरली आणि चालायला लागली. आरोपी भरत सोनी हा मागून ऑटो घेऊन येत होता. त्याने मुलगी पाहिली, ऑटो थांबवली आणि मुलीला हाक मारली. त्यात मुलगी बसली. मग तो तिला एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला. तिच्यावर बलात्कार केला आणि पळून गेला. भरतने पळून जाण्याचा आटोकाट प्रयत्न केला. यानंतर भरतने ऑटोचा नंबर बदलला असंही समजतं. त्याने ऑटोच्या काचेवर भावाच्या नावाचे स्टिकर लावले होते तेही काढले होते. फोन बंद केला होता. मात्र पोलिसांनी पूर्ण तयारीनिशी सापळा रचून भरत सोनीला पकडलं. भरत सोनी याचे वडीलही पुढे आले. ते म्हणाले, ‘ही घटना घडल्यापासूनच मला माहिती होतं. एका मुलीसोबत हा प्रकार घडल्याचे मी जेव्हा मुलाला सांगितलं तेव्हा तो काहीच बोलला नाही. त्याला फाशी दिली पाहिजे किंवा गोळी घातली पाहिजे.’ सध्या या मुद्द्यावरूनही राजकारण होत आहे.