लोकसभेत सुरक्षेच्या मुद्द्यावरून गदारोळ; विरोधी पक्षांचे 33 खासदार निलंबित
नवी दिल्ली | Winter Session : लोकसभेत (Lok Sabha) सुरक्षेच्या मुद्द्यावरून मोठा गदारोळ निर्माण झाला. विरोधी पक्षानं संसद भवनाच्या सुरक्षेतील त्रुटसंदर्भात सविस्तर स्पष्टीकरण देण्याची मागणी करत गोंधळ घातला. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांच्याकडून विरोधी पक्षांच्या 33 खासदारांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित (Suspended) करण्यात आलं.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काँग्रेसचे खासदार, विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्यासह 33 खासदारांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित केलं. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये अधीर रंजन चौधरी यांच्यासह तृणमूल काँग्रेसच्या सौगता रॉय, द्रमूकचे खासदार टी. आर. बालू, दयानिधी मारन यांच्यासह अन्य खासदारांचा समावेश आहे.
खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी मांडला होता. त्यानंतर आवाजी मतदानानं हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यामुळे ओम बिर्ला यांनी खासदारांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित हंगामासाठी निलंबित केलं आहे.