गुगल मॅपने दाखवला चुकीचा पत्ता; २० ते २५ विद्यार्थी UPSC परिक्षेपासून वंचित
देशभरात विविध ठिकाणी आज केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा पार पडल्या. परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना केंद्र देण्यात येतात. त्या केंद्रावरच जाऊन त्यांना परीक्षा द्यावी लागते. मात्र, संभाजीनगरमध्ये अनेक विद्यार्थी यूपीएससी परीक्षेपासून वंचित राहिले असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विद्यार्थ्यांना गुगल मॅपवर परीक्षा केंद्राचा चुकीचा पत्ता दाखवल्यामुळे त्यांना परीक्षा देता आली नसल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मराठवाड्यामधील काही जिल्ह्यातील विद्यार्थी छत्रपती संभाजीनगरला यूपीएससीची परीक्षा देण्यासाठी आले होते. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी देण्यात आलेल्या केंद्राचा पत्ता गुगल मॅपवर शोधला आणि त्या ठिकाणी पोहोचले. तिथे गेल्यानंतर विद्यार्थ्यांच्या लक्षात आले की, आपण सेंटरवर न पोहोचता दुसरीकडेच आलो आहोत. त्यानंतर विद्यार्थ्यांची मोठी धावपळ उडाली. त्यानंतर काही वेळाने विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आले नाही. जवळपास २० ते २५ विद्यार्थ्यांना या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेपासून वंचित राहावं लागलं असल्याची माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
यूपीएससी परीक्षा पास होण्यासाठी विद्यार्थी दिवसरात्र अभ्यास करत असतात. पण आज छत्रपती संभाजीनगरमध्ये काही विद्यार्थ्यांना गुगल मॅपवर चुकीचा पत्ता दाखवल्यामुळे परीक्षेपासून वंचित राहावे लागले. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना यावेळी अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.