“चित्राजी तुम्हाला संजय राठोड आठवतात का?”, उर्फी जावेदचा खोचक सवाल

मुंबई | Urfi Javed On Chitra Wagh – गेल्या काही दिवसांपासून भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि अभिनेत्री, मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) यांच्यात चांगलाच वाद सुरू आहे. चित्रा वाघ सातत्यानं उर्फीच्या कपड्यांवरून टीका करत आहेत. तसंच त्यांनी यासंदर्भात मुंबई पोलिसांकडे तक्रारही केली आहे. अशातच काल (2 जानेवारी) ‘उर्फी जावेद मला भेटली, तर तिच्या थोबडीत मारेन’, असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं होतं. त्यामुळे आता चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात सोशल मीडिया वाॅर पाहायला मिळत आहे.
काही तासांपूर्वीच चित्रा वाघ यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “आपल्या कामाची गरज म्हणून कोणाचा पेहराव तसा असेल, तर तो झाला कामाचा भाग यावर माझा किंवा कोणाचाही आक्षेप असायचं कारण नाही. पण जिथे आपण समाजात वावरतो सार्वजनिक ठिकाणी भर वस्ती आणि रस्त्यावर खुल्या वातावरणात आपला पेहराव व्यवस्थित राखणं हे सामाजिक भान आहे. तो जर राखला जात नसेल तर त्याला नंगट मानसिकता का म्हणू नये? व्यक्तीस्वातंत्र्याचा सन्मान न राखता, त्याचा अतिरेक करणाऱ्यांना रोखणं, हा ही धर्म नाही का?, लेकी-बाळी तर आपल्या प्रत्येकाच्याच घरी आहे, त्यांच्यासमोर असे आदर्श असावेत का?”, असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला आहे.
त्यावर आता उर्फी जावेदनं ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे. “मी भाजपामध्ये प्रवेश केल्यावर चित्रा वाघ आपण एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी नक्कीच बनू. चित्राजी, तुम्हाला संजय राठोड (Sanjay Rathod) आठवतात का? तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्याशी घनिष्ठ मैत्री झाली आणि तुम्ही त्यांच्या सर्व चुका विसरलात. पण राष्ट्रवादीत असताना मात्र त्यांच्यावर अनेक आरोप केले होते”, असं उर्फीनं ट्विट करत म्हटलं आहे.