वंचित बहुजन आघाडी लोकसभेच्या 48 जागा लढवणार; प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा
मुंबई | देशात अवघ्या काही महिन्यांत लोकसभा निवडणुका (Loksabha Election) होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशभरातील सर्वच पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. एकीकडे इंडिया आघाडी आणि एनडीए या दोन्हीही मोठ्या आघाड्या बैठका घेत आहेत. तर दुसरीकडे देशभरातील प्रादेशिक पक्ष देखील लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.
अशातच वंचित बहुजन आघाडीने (VBA) अलीकडेच ठाकरे गटाशी (Shivsena UBT) युती केली आहे. पण ठाकरे गट महाविकास आघाडीचा घटक पक्ष असला तरी वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतून ठाकरे गटाला किती जागा मिळणार आणि त्यातून वंचित बहुजन आघाडीला किती मिळणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. अशी एकंदरीत स्थिती असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा केली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सर्वच 48 जागांवर निवडणूक लढणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली आहे.
“आगामी 2024 च्या निवडणुकीत आम्ही लोकसभेच्या सर्व 48 जागा लढवू. आमच्या पक्षाने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मी अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे,” अशी घोषणा वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली.