‘बालगंधर्व’चा वर्धिष्णू परिवार

बालगंधर्व परिवार पुण्याचा मानबिंदू
बालगंधर्व रंगमंदिर म्हणजे प्रत्येक कलाकाराची पंढरी.. त्यांच्या आयुष्यात बालगंधर्व इतकं महत्त्व खचितच इतर कोणत्या वस्तूला असेल. कारण त्यांच्या कलाकार होण्याच्या प्रवासाचा श्रीगणेशा या वास्तूमध्ये झालेला असतो. कित्येकांचं ते स्वप्न असतं की आपलं कलाक्षेत्रातील पहिलं पाऊल या वास्तूत पडावं… त्यामुळे प्रत्येकाचा या वास्तुशी जिव्हाळा आहे… याच बालगंधर्व रंगमंदिराचा 54 वा वर्धापनदिन म्हणजेच सर्व पुणेकरांचा अत्यंत आवडता ‘बालगंधर्व महोत्सव’ नेहमीच्याच उत्साही वातावरणात पार पडणार आहे… बालगंधर्व महोत्सव म्हणजे पुणेकरांचं निखळ मनोरंजन, कलाकारांची मांदियाळी, महिलांसाठी लावणी, कलाकारांचा कौतुक सोहळा, कलाकारांच्या एक से बढकर एक कलाकृती, दिग्गजांचे मार्गदर्शन- गप्पा, वेगवेगळ्या विषयांवरची चर्चासत्रे इत्यादी इत्यादी… पण या सगळ्यांमध्ये खऱ्या अर्थाने बालगंधर्व महोत्सव म्हणजे नक्की काय असेल, तर कलाकारांनी कलाकारांच्या कौतुकासाठी पाठीवर मारलेली थाप म्हणजे बालगंधर्व महोत्सव… जगाच्या पाठीवर कुठेही केलेलं कौतुक एकीकडे आणि बालगंधर्व महोत्सवात मिळालेली कौतुकाची थाप एकीकडे… या सगळ्यांमध्ये नक्कीच हा महोत्सव आपले वेगळेपण टिकवून आहे… कारण हा परिवारच वर्धिष्णू परिवार आहे…
वारसा-
बालगंधर्वांच्या इतिहासाची विरासत
बालगंधर्व (नारायण श्रीपाद राजहंस) हे भास्करबुवा बखले यांचे शिष्य आणि मास्टर कृष्णरावांचे गुरुबंधू होत. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे गाणे ऐकून बाळ गंगाधर टिळकांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी बहाल केली. बालगंधर्व यांंनी संगीत सौभद्र, संगीत मृच्छकटिक, संगीत शाकुंतल, संगीत मानापमान, संगीत संशयकल्लोळ, संगीत शारदा, संगीत मूकनायक, संगीत स्वयंवर (नाटक), संगीत विद्याहरण, संगीत एकच प्याला, संगीत कान्होपात्रासह एकूण २५ विविध नाटकांत भूमिका केल्या.
त्यांची संगीत शाकुंतल नाटकातील ‘शकुंतला’ व मानापमान नाटकातील ‘भामिनी’ या भूमिकांमुळे एक प्रतिभावंत कलाकार म्हणून त्यांचे नाव सर्वत्र झाले. इ. स. १९५५ मध्ये त्यांनी एकच प्याला नाटकात साकारलेली सिंधू ही त्यांची शेवटची भूमिका ठरली.
इ. स. १९६८ मध्ये पुणे महापालिकेने बालगंधर्व रंगमंदिर हे नाट्यगृह त्यांच्या स्मृतीसाठी तयार केले.
ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी यात पुढाकार घेतला होता, तर त्याचे उद्घाटन आचार्य अत्रे यांनी केले. खुद्द बालगंधर्व हयात असताना त्यांच्या हस्ते जिमखान्यावर या वास्तूसाठी भूमिपूजन झाले होते. बालगंधर्वांची रंगभूमीवरील आपली कारकीर्द किर्लोस्कर संगीत मंडळी या नाट्यसंस्थेत इ. स. १९०५ मध्ये आरंभली. मात्र तिचे एक भागीदार नानासाहेब जोगळेकर यांच्या इ. स. १९११ मध्ये निधनानंतर संस्थेत वाद झाले. परिणामी इ. स. १९१३ मध्ये बालगंधर्वांनी गणेश गोविंद (गणपतराव) बोडस आणि गोविंदराव टेंबे यांच्यासह ती संस्था सोडली आणि गंधर्व संगीत मंडळीची स्थापना केली. मात्र इ. स. १९२१ मध्ये कर्जात अडकलेल्या या नव्या कंपनीचे नारायणराव राजहंस ऊर्फ बालगंधर्व एकमेव मालक होते. त्यानंतर त्यांच्या नाटकांनी लोकप्रियता मिळवली आणि गंधर्व संगीत मंडळी नाटकाच्या प्रॉपर्टीसह अनेक गोष्टींमध्ये दर्जा आणि अस्सलपणा राखण्याचा बालगंधर्वांचा आग्रह हेही त्याचे एक कारण सांगितले जाते.