‘राजकारणाचं काय खरं नाय’, वसंत मोरेंच्या पोस्टमुळे राजकिय चर्चेला उधाण…

पुणे : (Vasant More On Raj Thackeray) महाराष्ट्र नवनिर्मान सेनेतील पुण्यात दोन गटातील वाद विकोप्याला गेल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर यामध्ये अमित ठाकरे, राज ठाकरे यांनी मध्यस्थी करण्याचे अनेक प्रयत्न केले, मात्र ते काही केल्या मिटण्याचे चिन्ह दिसत नाहीत. त्यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट कठोर भुमिका घेत कार्यकर्त्यांना शेवटची ताकीद दिली होती.
दरम्यान राज ठाकरे म्हणाले होते, कार्यकर्त्यांची काही नाराजी असेल तर त्यांनी पक्ष नेतृत्त्वाच्या कानावर घालावे. पण जर कोणी पक्षांतील अंतर्गत बाबी सोशल मीडियावर अथवा माध्यमांवर बोललं तर हकालपट्टी अटळ असल्याची तंबी त्यांनी दिली आहे. पुण्यातील मनसेचे फायरब्रॅन्ड आणि मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेले वसंत मोरे यांनी पुणे शहर कोअर कमिटी आपल्याला डावलत असल्याचा आरोप केला आहे.
याबद्दल त्यांनी माध्यमांसमोर आपली जाहीर नाराजी व्यक्त केली होती. इतकंच नाही तर खडकवासला मतदारसंघातून नुकतेच मनसेत प्रवेश झालेले अप्पा आखाडे यांना पक्षाने पद द्यावे अशी मागणी देखील फेसबुक पोस्ट करून त्यांनी केली होती. त्यानंतर राज ठाकरेंनी पत्रक काढत पदाधिकाऱ्यांना इशारा दिला होता. त्यामुळे हे पत्र वसंत मोरेंनाच उद्देशून असल्याची चर्चा पुण्यात रंगू लागल्या आहेत.
हे पत्र काढल्यानंतर आता वसंत मोरेंची आणखी एक पोस्ट चर्चेत आहेत. ‘राजकारणाचं काय खरं नाही, हे लोकं निवडणुका कधी घेतील माहिती नाय बाबा… जरा उद्योग व्यवसायाकडे लक्ष केंद्रित करतो’ अशा आशयाची फेसबुक पोस्ट वसंत मोरेंनी केली आहे. त्यामुळे आता मोरेंच्या या पोस्ट वरून चर्चांना उधाण आले आहे. पुढील काळात राज ठाकरे आणि वसंत मोरे काय भुमिका घेतात हे पाहावं लागणार आहे.