ताज्या बातम्या

वसुबारस; गोवत्स द्वादशी 

डॉ. सोनल लेले

Diwali 2023 : सर्व सणांची अनभिषिक्त साम्राज्ञी  म्हणजेच ‘दिवाळी’ जी रमा एकादशीला सुरू  होते.  पणत्या व आकाशकंदिलाचा मंद ,उत्साहवर्धक प्रकाश,सुरेख रंग भरलेल्या मंगल रांगोळ्या, रसनेची तृप्ती करणारे विविध खाद्यपदार्थ, नवे कपडे, फटाक्यांची आतषबाजी अशा सर्व लवाजम्यासह अतिशय आनंदात धनत्रयोदशी ,नरकचतुर्दशी,लक्ष्मीपूजन,बलिप्रतिपदा म्हणजेच पाडवा आणि भाव बहिणीचं अतूट नातं सांगणारी भाऊबीज घेऊन येणारी चैतन्याची स्वामिनी म्हणजे दिवाळी!या दिवाळी आधी साजरा केला जाणार सण म्हणजे वसुबारस!

प्रत्यक्ष दिवाळीच्या सणात जरी या दिवसाची गणना होत नसली तरी आपल्या परंपरेत याला अनन्यसाधारण महत्व आहे. अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच वसुबारस. वसू म्हणजे धन आणि बारस म्हणजे द्वादशी. द्वादशी दिवशी आपण धन मानलेल्या गोधनाची म्हणजेच गाय आणि वासरु यांचं पूजन म्हणजे वसुबारस!! गायीला गोमाता म्हटलं जातं आणि तिच्या पोटात तेहतीस कोटी देवांचा वास असतो म्हणून तिला अतिशय पवित्र,मंगल मानलं जातं.एवढंच नाही तर आपल्या मुला बाळांचं, कुटुंबाचं उत्कृष्ट संगोपनही ती करते तेव्हा या सगळ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीही तिचं पूजन केल जातं.

या दिवसाचं अध्यात्मिक महत्व सांगणारी मान्यता अशी की वसू बारस दिवशी भगवान श्री विष्णूंच्या आपत्कात्मिक  लहरी ब्रम्हांडाच्या दिशेने येत असतात.या लहरी अतिशय पुण्यप्रद असून अखिल मानवजाती चं कल्याण करणारी शक्ती या लहरींमध्ये असते.विष्णुलोकी वास करणारी’वासवदत्ता’ नामक कामधेनू या लहरीं चं वहन ब्रम्हांडा पर्यंत करते.त्यामुळे वसुबारस ला तिचे कृतज्ञता पूर्वक स्मरण करून गायीचं वासवदत्ता स्वरूपात पूजन केले जाते.एका अर्थाने या दिवशी तिला ‘वासवदत्ता ‘च म्हटलं जातं ,थोडक्यात तिचं बारसच होतं म्हणा ना म्हणूनही वसू बारस !! चैतन्य बिजाची झालेली निर्मिती किंवा उत्पत्ती असाही बारस चा अर्थ आहे. अशा चैतन्याने भारलेल्या गायीला व वासराला सचैल स्नान घालून ,संध्याकाळी तुळशीपुढे उभं केलं जातं.गाय नसेल तर गाय आणि वासराची रांगोळी किंवा चित्रंही चालतं. पायावर पाणी घालून हळदी कुंकू वाहिले जाते.यादिवशी स्त्रिया एकभुक्त राहून व्रत करतात.पूजनाच्या वेळी ‘ओम गोविंदाय नमः’असा जप केला जातो. त्याचबरोबर  तिला वंदन करताना पुढील श्लोक म्हटला जातो.

क्षीरोदार्णवसंभूते सुरासुर नमस्कृतेl

सर्व देवमये मातृगृहणार्घ्य  नमोस्तुतेll

अर्थात, जिच्या शरीरात सर्व देवदेवता आहेत त्या हे माते,आमच्या पूजना चं अर्घ्य घे! तुला आमचा नमस्कार असो. हा श्लोक म्हणून तिला स्पर्श करावा. यानंतर पुरणपोळी किंवा इतर गोडधोड पदार्थ, उदीडवडे असा नैवेद्य तिला दिला जातो.आणखीन एक आख्यायिका म्हणजे समुद्रमंथनातून बाहेर आलेल्या ‘नंदिनी’ नामक कामधेनूच्या स्मरणार्थ ही हे व्रत केले जाते.

आपल्या कुटुंबाला दूध,दही,ताक,तूप या रुपात बल प्रदान करणारी गाय ही कामधेनूच आहे. वैज्ञानिक दृष्ट्या गायीचं दूध पचायला अतिशय हलकं व सर्वात जास्त पोषणमूल्य असल्याने बाळालासुद्धा आईच्या दुधानंतर  प्रथम तेच दिलं जातं. आपल्या भारतीय वंशाच्या गायीचं वशिंड मोठं असून त्यामध्ये वैश्विक ऊर्जा शोषली जाते. म्हणूनच गायीच्या वशिं डाला नियमितपणे स्पर्श केल्यास  अनेक आजार बरे होतात.त्याच बरोबर गायीचं मूत्र ज्याला आपण गोमूत्र म्हणतो,शेण हेही अतिशय उपयुक्त आहे. अनेक औषधांमध्ये गोमूत्र वापरले जाते तर शेणापासून बनवलेल्या गोवऱ्या यज्ञाहुतीत तुपासह  वापरल्या जातात.अग्निहोत्रामध्ये याच्या वापराने  सकारात्मक ऊर्जा निर्माण होते , निर्जंतुकीकरणही होते. गायीच्या सहवासात राहिल्याने कॅन्सर सारखे  दुर्धर आजार बरे होत असल्याचे दाखलेही आहेत.यावरून गोमातेची उपयुक्तता आपल्या ध्यानांत येते. भगवान श्रीकृष्ण गोकुळात असतांना गायींच्या सतत सान्निध्यात असायचे हे तिचं महत्व जाणून घ्यायला पुरेसचआहे ! महर्षी वसिष्ठ यांनीही गवोपनिषदांत गोमाते चं महत्व सांगणारा श्लोक लिहिला आहे- 

घृतक्षीरप्रदा गावो घृतयोन्यो घृतोदभव: ll   

घृतनद्यो घृतावर्तास्ता मे संन्तु सदा गृहेll 

घृत मे हृदये नित्य घृत नाभ्या प्रतिष्टीतमll 

घृतम सर्वेशु गात्रेशु  घृतम मे मनस्थितितम्ll 

गावो ममाग्रतो नित्यम  गाव: पृष्ठत एव च l 

गावो मामुपतिष्ठन्ता मिति नित्यम प्रकिर्तयेतll 

अर्थात, तूप व दुध देणाऱ्या , तुपाचं उत्पत्ती स्थान असलेल्या,तूप प्रकट करणाऱ्या, तुपाची नदी असलेल्या गायी माझ्या घरी सदैव वास करो.गायीचं तूप सदैव माझ्या हृदयात स्थानापन्न होवो.तूप माझ्या नाभि मध्ये वास करो.माझ्या संपूर्ण शरीरात तुपाची व्याप्ती राहो आणि माझ्या मनातही तूप स्थान बद्ध होवो.गायी माझ्या पुढे राहो,मागे राहो,चारी बाजूनी राहो आणि मी गायींच्या मध्ये निवास करो.

या श्लोकांत आपल्या  शरीराला आणि मनालाही तुपाच्या स्निग्धतेची किती आवश्यकता आहे हे नमूद केलं आहे. तर अशा अध्यात्मिक,धार्मिक आणि वैज्ञानिक सामर्थ्याने परिपूर्ण असलेल्या गोमातेला त्रिवार वंदन!! वसुबारस दिवशी हे मंगल पूजन घरोघरी होवो आणि आपल्या सर्वांना तिची कृपा प्राप्त होवो आणि ब्रह्मांडातील श्रीहरींच्या पुण्याप्रद लहरींचा लाभ होवो हीच सदिच्छा!!

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये