मुंबई – Vinayak Mete Journey: आज पहाटे( रविवार, १४ ऑगस्ट) शिवसंग्राम संघटनेचे (Shivsangram) अध्यक्ष माजी आमदार विनायक मेटे यांचे कार अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. सर्वच क्षेत्रांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. मेटे हे मुंबईकडे जाण्यासाठी रात्री बीडहून निघाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणासंबंधित होणाऱ्या बैठकीसाठी ते उपस्थित राहणार होते. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ त्यांचा अपघात झाला. मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात मेटेंच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती. उपचारादरम्यान मेटे यांचं निधन झालं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली.
दरम्यान, मेटे यांच्या अपघाताबद्दल सर्व क्षेत्रांतून प्रतिक्रिया येत आहेत. मेटे यांचा अपघात झाला की घातपात करण्यात आला अशीही शंका अनेकांकडून वर्तवली जात आहे. मराठा क्रांती मोर्चाकडून मेटे यांच्या घात करण्यात आला असेल अशी शंका वर्तवण्यात आली आहे. या प्रकरणाचा पोलिसांच्या ८ पथकांकडून तपास केला जाणार आहे.
विनायक मेटे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोठा लढा दिलेला आहे. मराठा क्रांती मोर्चामध्ये त्यांचे मोठे योगदान राहिलेले आहे. तब्बल पाच वेळा ते विविध पक्षांकडून विधानपरिषदेत आमदार म्हणून निवडून आले होते. सर्वच पक्षांतील नेत्यांसोबत मेटे यांचे चांगले संबंध राहीलेले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेटे जवळचे मित्र होते.
विनायक मेटे यांचा राजकीय प्रवास
मेटे यांची जन्मभूमी बीड मधील केज तालुक्यातील नांदूरघाट पासून काही अंतरावरील राजेगाव. सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील विनायक मेटे पाच वेळा विधानपरिषद आमदार होऊन रेकॉर्ड बनवतील असं कोणालाही वाटलं नव्हतं. त्यांची राजकीय कारकीर्द मराठा महासंघापासून सुरु झाली. मराठा महासंघाच्या कार्यालयात ते काम करायचे. कालांतराने ते महासंघाचे सचिव झाले. मराठा महासंघाकडून मराठा आरक्षणासाठी सुरुवातीपासून मागणी केली जात होती. त्यासाठी महासंघाने एक पक्ष देखील स्थापन केला होता. त्या पक्षाला गोपीनाथ मुंडे यांनी भाजपमध्ये विलीन करून घेतलं. गोपीनाथ मुंडे यांनी विनायक मेटे यांना भाजपमधील मराठी चेहरा म्हणून पुढं आणलं आणि १९९५ च्या युती सरकारमध्ये विधानपरिषदेत जागा दिली. त्यांनतर मेटे यांचा दबदबा चांगलाच वाढला होता.
१९९९ मध्ये राष्ट्रवादी – कॉंग्रेस सरकार सत्तेत आले. राष्ट्रवादीने मेटे यांच्या पक्षाला राष्ट्रावादीत विलीन करून घेतले आणि दोनवेळा विधानपरिषदेत जागा दिली. २०१२ मध्ये त्यांची राष्ट्रवादीकडून प्रदेश उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांनतर त्यांची ताकत वाढतच जात होती. राष्ट्रवादी मध्ये छगन भुजबळ यांची समता परिषद आणि मेटे यांची शिवसंग्राम यांच्यात वाद होऊ लागले. दरम्यान, मेटे यांनी मराठा आरक्षणावरून आघाडी सरकारच्याच विरोधात आवाज उंचावला.
२०१४ च्या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांनी पुन्हा एकदा भाजपला मराठा चेहरा मिळवून देण्यासाठी विनायक मेटे यांना भाजपमध्ये घेतलं. महायुती काळात मेटे यांना पुन्हा एकदा भाजपकडून विधान परिषदेवर पाठवण्यात आलं. त्यांनतर त्यांची अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकासाठीच्या ‘शिवस्मारक समिती’च्या अध्यक्षपदी देखील त्यांची निवड करण्यात आली. २०२० मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मराठा क्रांती मोर्च्याच्या मराठा समन्वयक पदावर ते आजपर्यंत कार्यरत होते.
२०१४ ला मेटे यांनी भाजपकडून बीड विधानसभेची निवडणूक लढली होती, मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. २०१९ ला भाजपला शिवासंग्रमचा पाठींबा राहील अशी घोषणा मेटे यांनी केली होती. मात्र, पंकजा मुंडे यांच्यासोबत मेटें यांचा वाद सुरु झाला.
मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीत बीडमधील नांदूरघाट जवळील नेकनूर, चौसाळा, विडा, लिंबागणेश या ठिकाणी त्यांच्या शिवसंग्राम पक्षाने विजय मिळवला होता.