पुणेरी पलटणचा दबंग दिल्ली संघावर विजय
विवो प्रो कबड्डी स्पर्धा; मोहित गोयत व आकाश शिंदे यांची अफलातून खेळी
पुणे : मशाल स्पोर्ट्स यांच्या वतीने आयोजित नवव्या विवो प्रो कबड्डी स्पर्धेत साखळी फेरीत मोहित गोयत व आकाश शिंदे यांच्या पल्लेदार चढायांच्या जोरावर पुणेरी पलटण संघाने दुसऱ्या स्थानावर असलेल्या दबंग दिल्ली संघावर ४३-३८ असा सनसनाटी विजय नोंदविला. पूर्वार्धात पुणेरी पलटण संघाने २३-१७ अशी आघाडी घेतली होती. हीच आघाडी त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली.
शिवछत्रपती क्रीडा नगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेत स्थानिक मैदानावर आणि प्रेक्षकांच्या पाठिंब्यावर पुण्याचा संघ कशी कामगिरी करतो याची उत्सुकता होती. त्यांचा भरवशाचा खेळाडू मोहित गोयत याने एकाच चढाईत तीन गडी बाद करीत पुण्याचे खाते उघडले. त्याच्या पल्लेदार चढायांच्या जोरावर पुणे संघाने सातव्या मिनिटालाच पहिला लोण चढविला. त्याला आकाश शिंदे याची चांगली साथ लाभली. पुणे संघाने चढायांच्या जोरावरच पंधराव्या मिनिटाला दुसरा लोण नोंदविला. त्यावेळी त्यांच्याकडे ११ गुणांची आघाडी होती. दिल्ली संघाने जिद्दीने खेळ करीत ही आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. दिल्ली संघाकडून नवीन कुमार व मनजीत यांना मर्यादितच यश मिळाले. तुलनेने आशु मलिक याने चढायांमध्ये प्रभाव दाखविला. मध्यंतराला पुण्याने सहा गुणांची आघाडी मिळविली होती.
उत्तरार्धात दिल्ली संघाच्या नवीन कुमार याला सूर गवसला. त्याला अन्य खेळाडूंची चांगली साथ लाभली. त्यांनी दुसऱ्याच मिनिटाला लोण परतविला. त्यावेळी पुण्याकडे फक्त एक गुणाची आघाडी राहिली होती साहजिकच सामन्यातील उत्कंठा वाढली. नवीन कुमार याने या स्पर्धेच्या इतिहासातील आतापर्यंत ८०० गुणांचा टप्पा ओलांडला.
पुण्याचा आकाश शिंदे याने एका चढाईत तीन गड्यांना बाद करीत संघाची आघाडी पुन्हा वाढविली. २८ व्या मिनिटाला पुणे संघाने आणखी एक लोण चढविला आणि मोठी आघाडी घेतली. तरीही दिल्ली संघाच्या खेळाडूंनी चिवट लढत दिली. शेवटची पाच मिनिटे बाकी असताना पुणे संघाकडे पाच गुणांची आघाडी होती. शेवटपर्यंत त्यांनी आघाडी कायम ठेवीत सामना जिंकला. साखळी गटात त्यांचा हा पाचवा विजय आहे.