अग्रलेखरणधुमाळीराष्ट्रसंचार कनेक्टसंपादकीय

जनाधाराची परीक्षा

काँग्रेसला संपूर्ण देशभरातून सुमारे १२ कोटी लोक मतदान करतात. यातील बहुतांशी मतदान हे पारंपारिक मतदान आहे. काँग्रेसला मानणाऱ्या मागील दोन पिढ्यांपासून पंजाला मतदान करण्याची निष्ठा वाहत हे बहुतांशी मतदान होते. ‘गांधी घराण्याच्या बाहेरील अध्यक्ष’ पदाच्या उमेदवारासाठी आता हे मतदान होणार आहे. त्यामुळे हा जनाधार नेमका कशा पद्धतीने व्यक्त होतो? यावर काँग्रेसच्या पुढचा चेहरा आणि वाटचाल ठरणार आहे..

काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे दोघेही काँग्रेसच्या अध्यक्षपदाकरिता इच्छुक नाहीत हे त्यांनी अनेकदा उक्तीतून आणि कृतीतून देखील व्यक्त केले आहे . परंतु , ‘तुम्हीच आमचे मायबाप’ म्हणून गळे काढत ‘गांधी घराणेच काँग्रेसला तारणहार आहे ‘, अशी एक चापलुसी मानसिकता काँग्रेसमध्ये दिसून येते. नरसिंहराव यांच्या कार्यकाळातील काही वर्ष सोडले तर काँग्रेस अध्यक्ष पदाकरिता गांधी घराण्याच्या बाहेरील व्यक्ती कधीही झाली नाही आणि लोकांनी ती स्वीकारली देखील नाही.

लोकांनी स्वीकारण्यापेक्षा अधिक काँग्रेसच्या निष्ठावंत सैनिकांनी स्वीकारले नाही. यावर चर्चा नेहमी होते, परंतु हा प्रयोग म्हणून देखील काँग्रेसने आणि त्यांच्या वरिष्ठ कार्यकारिणीने हे करण्याचा विचार कधी केला नाही. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष पद हे गांधी घराण्यातीलच पाहिजे ही एक मानसिकता निर्माण झाली आहे. नरेंद्र मोदी यांच्या झंजावाता नंतर मात्र सोनिया गांधी आणि त्यानंतर राहुल गांधी यांची प्रभाव क्षमता कमी होत असल्याचे दिसल्यानंतर काँग्रेसला एका ‘नव्या नेतृत्वाची गरज’ असल्याचा विचार पुढे आला, त्यातूनच सोनिया-राहुल नको किंवा त्यांच्या बरोबरीने दुसरा चेहरा आणण्याचा सूर काँग्रेसच्या काही जुन्या जाणत्या नेत्यांनी लावला. जी २० च्या नावाखाली हा वेगळा सूर मांडण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. परंतु काँग्रेस हाय कामांच्या वर्तुळातूनच त्याला फारशी मान्यता नव्हती. त्यामुळे पुन्हा हा विचार मागे पडला. आता मात्र स्वतः राहुल गांधी यासाठी इच्छुक नसल्याचे सांगत असल्यामुळे अशोक गहलोत, शशी थरूर अशा लोकांची नावे पुढे येत आहेत.

पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील आपला वेगळा सूर आळवत महाराष्ट्र काँग्रेसमध्ये देखील खळबळ उडवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु एकूणच काँग्रेसची गांधी घराण्याप्रती अत्यंत निष्ठेची किंवा प्रसंगी चापलुसी ची भूमिका पाहता पृथ्वीराज चव्हाण हे आता एकटे पडल्याचे दिसत आहे. काँग्रेसचा मतदार हा मूळ ग्रामीण मतदार आणि कोरडवाहू क्षेत्रातील मतदार आहे. खऱ्या अर्थाने सामान्य लोकांचा हा पक्ष बऱ्याच कारणामुळे त्या लोकांपासून दूर जात आहे. पक्षाच्या चेहऱ्यापेक्षा सुद्धा पक्षाच्या ध्येय धोरणाला आणि वैचारिक जडणघडणीला महत्त्व देत त्याचा अजेंडा पुढे राबविण्याचे आवश्यकता आहे.

काँग्रेस हा व्यक्ती पूजक आहेत परंतु त्याहीपेक्षा विचारपूजक देखील आहे. इंदिरा गांधी या महिला किंवा नेत्या म्हणून तशा प्रभावी होत्या, त्याहीपेक्षा त्या एका वैचारिक मानदंडावरती यशस्वी ठरल्या होत्या. धाडसीपणा, करारीपणा, सार्वजनिक हित, कोरडवाहू शेतकऱ्यांचे हित अशा अनेक अजेंडांचा तो परिपाक होता. दुर्दैवाने आज काँग्रेसमध्ये या धोरणांची चर्चा केली जात नाही. तर हळूहळू ती व्यक्ती पूजेकडे सरकत आहे. त्यामुळे देखील पक्षाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. एक नवा विचार घेऊन – नवा चेहरा घेऊन जर पक्षाने पुढे मार्गक्रमण केले तर जुने वैभवाचे दिवस येण्याची संधी निर्माण होऊ शकते. परंतु चेहऱ्याचा वाद टाळत धोरणांवरती काम करत आता पक्षाने तातडीने सामान्य लोकांशी कनेक्ट होण्याचे साधन हाती घेतले पाहिजे. भारत जोडो अभियानाच्या माध्यमातून राहुल गांधी हा प्रयोग यशस्वीपणे करीत आहेत. त्याला सर्वांनी साथ दिली पाहिजे तरच या पक्षाचे भवितव्य काहीतरी खरे आहे. येत्या गुरुवारी अध्यक्ष पदाची निवडणुकीची अधिसूचना काढण्यात येणार आहे. बारा कोटी जनतेचा जनाधार नेमका कोणत्या दिशेने जातो हे या निमित्ताने समजणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये